मराठवाडा

Hingoli : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी आजेगावात रास्ता रोको; गोरेगावात रस्त्यावर दूध ओतून निषेध

backup backup

गोरेगाव, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील अतिवृष्टीतून वगळलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना अनुदान द्यावे या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या वतीने बुधवारी सकाळपासून येलदरी ते कनेरगाव या राष्ट्रीय महामार्गावर आजेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विदर्भाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला आहे.

सेनगाव तालुक्यातील चार मंडळे अतिवृष्टीच्या नुकसानीतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून या मंडळातील शेतकऱ्यांना अनुदान द्यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून मागील पाच दिवसांपासून गोरेगाव येथे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनामध्ये गोरेगाव येथे सुमारे 40 लिटर दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी नामदेव पतंगे, नामदेव कावरखे यांच्या सह शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली.

जो पर्यंत शेतकऱ्यांना अनुदान दिले जात नाही तो पर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या वतीनेही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आजेगाव चौफुली येथे सकाळी आठ वाजल्या पासून रास्तारोको आंदोलन सुरु करण्यात आले. याबाबत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या सेनगाव तालुकाध्यक्षा वैशाली वाघ, प्रकाश वाघ, ज्ञानबा जाधव, माधव काळे, विशाल मुळे, गजानन भडके, बद्री चौधरी यांच्यासह शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनात महिला शेतकऱ्यांचीही उपस्थिती आहे. सेनगाव तालुक्यातील सर्वच मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे विदर्भाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

SCROLL FOR NEXT