झरी : 'सेफ फूड सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने परभणी तालुक्यातील झरी येथे रविवारी कारवाई केली. या कारवाईत पावणेसात लाख रुपये किमतीचे १९८८ किलो धणे पावडर, अख्खी हळद पावडरचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला.
परभणी तालुक्यातील झरी येथील रामभरोसे रोडवरील गट नं. ११ मधील 'झरीकर फूड्स प्रायव्हेट लिमिटेड' या मसाला उत्पादन युनिटवर रविवारी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईदरम्यान सदर युनिट मधून तब्बल १ हजार ९८८ किलो संशयास्पद साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ५ लाख १५,५२० रुपये किमतीचा १,४५० किलो धने पावडर तर १ लाख ७३,४०० रुपये किमतीची ५३८ किलो अख्खी हळद असा एकूण ६ लाख ८८ हजार ९२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा संपूर्ण साठा पूर्णपणे सील करून ठेवण्यात आला आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या किंवा अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई यापुढेही सुरूच राहील, असा सज्जड इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अन्न व मसाला उत्पादकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
एफडीआयच्या रडारवर आणखी कोण कोण ?
अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात मोहिम उघडली आहे. कधी नव्हे ऐवढा अन्न व औषधी प्रशासन विभाग कारवाईच्या मुड मध्ये दिसून येत आहे. एफडीआयने तक्रारीसाठी टोल फ्रि नंबर जाहीर केल्यानंतर एफडीआयच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. परभणी एफडीआयने नव्हे ऐवढ्या कारवायांचा धडाका लावला असून आगामी काळात परभणी एफडीआयच्या रडारवर अन्न व औषधी प्रशासन विभागाशी संबंधीत कोण भेसळखोर असणार आहेत ? याची नागरिकांमधून चर्चा होताना दिसून येत आहे.