Illegal Liquor Sale pudhari photo
परभणी

Illegal Liquor Sale : झरी येथील अवैध दारू विक्रीला लगाम कधी लागणार?

प्राथमिक आरोग्‍य केंद्र, शाळांच्‍या परिसरातच खुलेआम गोरखधंदा; ग्रामस्‍थ संतप्‍त

पुढारी वृत्तसेवा

झरी : येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच प्रभात स्कूल ते जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. विशेष म्हणजे शाळा, आरोग्य केंद्र आणि वर्दळीच्या परिसरातच हा व्यवसाय सुरू असल्याने महिला, विद्यार्थिनी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार पोलिस पाटील व ग्रामीण पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊनही ठोस व कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

गावात अवैध दारू विक्रीचा प्रश्न नवीन नसून अनेक वर्षांपासून तो कायम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधित ठिकाणी दारूची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक पातळीवर पोलिस प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यानंतर अधूनमधून कारवाई केली जाते; मात्र ही कारवाई काही काळापुरतीच मर्यादित राहत असल्याने पुन्हा त्याच ठिकाणी दारू विक्री सुरू होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईचा नेमका परिणाम काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर तसेच जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात अवैध दारू विक्री होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उपचारासाठी येणाऱ्या महिला व माता-भगिनी तसेच शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तींमुळे त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शाळा आणि आरोग्य केंद्रासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारची विक्री सुरू राहणे ही गंभीर बाब असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी दारू विक्रीचा व्यवसाय अधिक जोमाने सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या अवैध व्यवसायातून दररोज मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे कारवाई करून काही दिवस व्यवसाय बंद ठेवला जातो आणि त्यानंतर पुन्हा तो सुरू होतो, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची तक्रार आहे. गावात अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी असूनही त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

काही स्थानिक राजकीय मंडळींच्या कथित दुर्लक्षामुळे या व्यवसायाला अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. झरीतील अवैध दारू विक्रीचा प्रश्न केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरता मर्यादित नसून महिला, विद्यार्थिनी आणि तरुणांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

त्यामुळे स्थानिक पातळीवरील कारवाईवर अवलंबून न राहता जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची स्वतंत्रपणे दखल घेऊन चौकशी करावी, अवैध दारू विक्रीची ठिकाणे शोधून कठोर कारवाई करावी आणि शाळा व आरोग्य केंद्र परिसरात हा व्यवसाय पुन्हा सुरू होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी झरी ग्रामस्थांनी केली आहे. अवैध दारू विक्रीचा हा प्रकार तातडीने बंद झाला नाही, तर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येत आहे.

कारवाई होते, पण धंदा सुरू

अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांकडून अधूनमधून कारवाई केली जाते. मात्र, कारवाईनंतर काही दिवसांतच पुन्हा विक्री सुरू होत असल्याने कारवाईचा धाक राहिलेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. संबंधितांवर केवळ जुजबी कारवाई न करता अवैध दारू विक्रीचे मूळ शोधून कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT