Purna Bridge Train Youth Death
पूर्णा: पूर्णा ब्रीजजवळ रेल्वे रुळावर एका युवकाचा मृतदेह आढळून आला. गणेश बालाजी रामगिरे (वय २८, रा कोळीवाडा, ता. पूर्णा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती संबंधित रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांना वेळेत देण्यात आली होती. मात्र, रेल्वे पोलीस घटनास्थळी वेळेत न पोहोचल्याने मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया करण्यास विलंब झाला. दरम्यान, रेल्वे वाहतूक सुरूच राहिल्याने मृतदेहावरून अनेक रेल्वेगाड्या गेल्याचा गंभीर प्रकार घडला. या घटनेमुळे रेल्वे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रेल्वे रुळावर व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह सुरक्षितपणे ताब्यात घेणे, पंचनामा करणे तसेच आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित यंत्रणेकडून झालेल्या कथित दिरंगाईमुळे मृतदेह बराच वेळ रेल्वे रुळावरच पडून राहिला. याच कालावधीत रेल्वे वाहतूक सुरू राहिल्याने मृतदेहावरून रेल्वेगाड्या गेल्या. त्यामुळे मृतदेहाची अवहेलना झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नन्नवरे यांनी केली आहे. संबंधित रेल्वे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती नेमकी कोणत्या वेळी मिळाली, त्यानंतर घटनास्थळी पोहोचण्यासाठी किती वेळ लागला, तसेच मृतदेह रुळावर असताना रेल्वे वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, स्टेशन डायरी, कंट्रोल रूम लॉग, दूरध्वनी व वायरलेस संदेशांच्या नोंदी तपासाव्यात. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घटनेच्या प्रत्येक टप्प्याची पडताळणी करावी. चौकशीत दिरंगाई किंवा निष्काळजीपणा आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नन्नवरे यांनी केली आहे.
या घटनेमुळे रेल्वे रुळावर अपघात अथवा मृत्यू झाल्यानंतर तातडीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, रेल्वे प्रशासन याप्रकरणी काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.