Electricity Supply Cut Pimpala Village Parbhani
पूर्णा: तालुक्यातील पिंपळा लोखंडे येथील एका युवकाने ३३ केव्ही विद्युत केंद्रात जाऊन हुज्जत घातल्याची घटना घडली आहे. दरम्यान, महावितरण केंद्रातील यंत्र चालकास जीवे मरण्याची धमकी देत १० गावांचा वीज पुरवठा बंद केला. या प्रकरणी आज (दि.१५) चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी युवकाला अटक केली आहे. त्यामुळे त्याला स्टंटबाजी चांगलीच भोवली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळा लोखंडे येथे महावितरणचे ३३ केव्ही उपकेंद्र आहे. या केंद्रात महावितरणकडून ३ विद्युत यंत्र चालकांची नेमणूक केली आहे. येथे बुधवारी (दि. १४) रात्री १० च्या दरम्यान गावातील युवक लक्ष्मण उत्तमराव लोखंडे (वय ३० ) यांच्या घरावरुन गेलेल्या विद्युत तारा काढून घेत नाहीत, म्हणून त्याने यंत्र चालकास जिवे मरण्याची धमकी दिली. तसेच केंद्रात प्रवेश करत १० गावांचा वीजपुरवठा बंद केला. शिवाय, विद्युत केंद्रातील एमव्ही रोहित्रावर बसून रात्रभर स्टंटबाजी केली. महावितरणच्या वरिष्ठ अभियंत्यास देखील फोनवरुन शिवीगाळ करुन धमकी दिली.
या प्रकरणी विद्युत यंत्रचालक संदीप चिमणवाड यांनी चुडावा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार तरुणावर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुखेडकर करत आहेत.