परभणी

परभणी: पन्‍नास टक्के मतदान केंद्रांवर होणार वेब कास्टिंग : जिल्हाधिकारी

अविनाश सुतार

परभणी, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत जिल्हयातील 2 हजार 280 मतदान केंद्र असून यापैकी 1 हजार 140 मतदान केंद्रावर म्हणजेच 50 टक्के केंद्रांवर मतदान प्रक्रियेचे वेब कास्टिेंग केले जाणार आहे. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासह अचानक केंद्रांवर गर्दी वाढली तर ती नियंत्रणात आणण्यासाठीही वेब कास्टिंगचा मोठा फायदा होणार असल्याने हा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून परभणी मतदारसंघात दुसर्‍या टप्प्यात दि.26 एप्रिलला मतदान घेतले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी रघुना गावडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात रविवारी (दि.17) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीची अधिसुचना दि.28 मार्चला जारी केली जाणार असून तेंव्हापासून उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहेत. दि.4 एप्रिलला उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख राहणार असून दि.5 एप्रिलला छाननी केली जाणार आहे. तसेच दि.8 एप्रिलला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून दि.26 एप्रिलला प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर दि. 4 जुनला मतमोजणी होणार असल्याचे सांगितले. या प्रक्रियेसाठी वनामकृृविच्या कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात ईव्हीएम ठेवण्यासाठी स्ट्रॉग रुम तयार करण्यात आली असून तेथेच मतमोजणी केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी गावडे यांनी दिली.

परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण 21 लाख 16 हजार 704 एवढे मतदार असून त्यात 11 लाख 730 पुरूष तर 10 लाख 15 हजार 949 महिला, 25 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. निवडणुक अनुषंगाने जिल्ह्यातील संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याचेही म्हटले. मतदारसंघात 2 हजार 280 मतदान केंद्र असून त्यात 10 सहाय्यक मतदान केंद्र आहेत. तसेच यापैकी 47 मतदान केंद्र हे संवेदनशिल असल्याचे सांगितले असून त्याठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त दिला जाणार असल्याची माहिती दिली. एवढेच नव्हे तर 10 मतदान केंद्रावर केवळ महिला मतदान अधिकारी राहणार असून 7 ठिकाणी केवळ दिव्यांग मतदान अधिकारी राहणार आहेत. तसेच 10 मतदान केंद्रावर तरूण अधिकारी हे मतदान अधिकारी म्हणून काम पाहतील.

काही मतदान केद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून तयार केले जाणार आहेत. 40 टक्क्यापेक्षा अधिक दिव्यांग व 85 पेक्षा अधिक वयस्कर असलेल्या मतदारांना यावेळी आयोगाने विशेष सुविधा दिल्या आहेत. जर मतदार हे मतदान केंद्रावर येण्यास असक्षम असतील तसेच ते घरून मतदानाचा हक्‍क बजाण्यास इच्छुक असतील तर त्या पध्दतीने त्यांचे मतदान करून घेतले जाणार आहे. यासाठी मतदानापुर्वी विशिष्ट अर्ज भरून त्यांना द्यावा लागणार आहे. तसेच उमेदवारांना 95 लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा देण्यात आली असून याचे दरही निश्‍चीत करून त्याबाबतची माहिती राजकीय पक्षांच्या झालेल्या दि.15 मार्च रोजीच्या बैठकीत दिलेली आहे. निवडणुकीसाठी सध्या बीयु 3 हजार 716, सीयु 2 हजार 55 तर व्हीव्हीपॅट 2 हजार 172 मशिनची उपलब्धता आहे. जिल्हास्तरावर कंट्रोल रूम तयार करण्यात आली. निवडणुकीसाठी जिल्हयात 170 क्षेत्रिय अधिकारी, 550 विविध पथकात अधिकारी व कर्मचारी आणि मतदान केंद्रावरील अधिकारी अशाप्रकारे 7 हजार 935 जणांचे मणुष्यबळ लागणार असून हे सर्व अधिकारी व कर्मचारी उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी गावडे यांनी सांगितले.

विविध पथकांची करडी नजर

निवडणुक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासह उमेदवारांच्या खर्च मर्यादेवर देखरेख ठेवण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. यात जिल्हास्तरावर एक तर चार विधानसभा स्तरावर प्रत्येकी एक लेखा पथक, 21 फिरते पथक, 27 स्थिर सर्वेक्षण पथक, 23 व्हिडीओ चित्रीकरण पथक, 8 व्हिडीओ पाहणी पथक स्थापन झाले आहेत.

75 टक्के मतदान अपेक्षित

मागील लोकसभा निवडणुकीत 19 लाख 83 हजार 903 पैकी 12 लाख 51 हजार 825 मतदारांनी आपला मतदान हक्‍क बजावला होता. ही टक्केवारी 60.48 टक्के राहिली असून यात 6 लाख 76 हजार 783 पुरूष तर 5 लाख 75 हजार 142 महिला मतदार होत्या. पण आता पार पडणार्‍या निवडणुकीत 100 टक्के मतदानाची तयारी करण्यात आली असून यात 75 टक्के तरी मतदान होणे अपेक्षीत असल्याने मतदारांनी हक्‍क बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

पोलिसांचा मोठा फौजफाटा

निवडणुक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एक पोलिस अधिक्षक, पाच डिवायएसपी, 1 हजार 600 अंमलदारांसह एक सीआरपीएफचे पथक तैनात झालेले आहे. तरीही 2 हजार अंमलदारांची गरज असून ऐनवेळी होमगार्डसही मदत होणार आहे. याकरिता लागणारे अतिरिक्‍त मणुष्यबळ राज्याच्या मुख्यालयाकडून मिळणार आहे. निवडणुकीची पुर्ण तयारी झाली असून प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरू केली. समन्स, वॉरंटची प्रभावी अंमलबजावणी होत असून अवैध दारूसह हत्यार वापरणांवर कडक कारवाई केली जाणार आहे. हत्यार परवाने ज्यांच्याकडे आहेत त्यांनी ते हत्यारे पोलिसांकडे जमा करून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT