Purna Viswadeep Kamble death case
पूर्णा: शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी हरीनगर भागात बांधण्यात येत असलेल्या जलकुंभासाठी खणलेल्या खड्यात पडून विश्वदीप कांबळे (वय १०) या बालकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या नगरपरिषदेचे सिईओ, अभियंता व गुत्तेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी नगरपरिषद कार्यालयाला ताळे ठोकून ठिय्या आंदोलन छेडले.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि गुत्तेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. या वेळी राजू नारायणकर, प्रताप कदम, सुनील मगरे, देवराव खंदारे, लक्ष्मीकांत गायकवाड, संजय वाघमारे, बाबा पठाण यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
२८ ऑगस्टच्या रात्री विश्वदीप खेळण्यासाठी घराबाहेर गेला असता तो पाण्याचा जलकुंभ बांधण्यासाठी खोदलेल्या मोठ्या खड्यात पडला. खड्याभोवती कुठलाही सुरक्षा फलक, कठडे किंवा कुंपण नसल्यामुळे ही दुर्घटना घडली. अंधारामुळे वेळेवर मदत मिळाली नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला परंतु तो आढळला नाही. शेवटी पोलिसांना तो खड्यात मृत अवस्थेत सापडला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
बालकाचा बळी गेल्यानंतर नागरिक संतप्त झाले असून, नगरपरिषद प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे हा जीव गेला, असा आरोप करण्यात येत आहे. आंदोलनावेळी कार्यकर्ते नगरपरिषद कार्यालयात गेले असता कोणतेही अधिकारी उपस्थित नसल्याने संतापाची लाट उसळली.
दरम्यान, विश्वदीपवर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पूर्णा पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.