Vaishali Sadegavkar Topper MPSC Pudhari
परभणी

MPSC Success Story |गंगाखेडची वैशाली साडेगावकर राज्यात मुलींमध्ये प्रथम; अन्न व औषध प्रशासनात सहाय्यक आयुक्तपदी निवड

Parbhani News | महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल जाहीर

पुढारी वृत्तसेवा

Gangakhed Vaishali Sadegavkar Topper MPSC

गंगाखेड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात गंगाखेडची भूमिपुत्री वैशाली विजयकुमार साडेगावकर हिने उल्लेखनीय यश संपादन केले. तिची अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त (वर्ग-१) पदासाठी निवड झाली. विशेष म्हणजे या परीक्षेत तिने राज्यातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावत गंगाखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वैशालीच्या आयुष्यात लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत तिने आपले शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मन्नानगर येथे, तर माध्यमिक शिक्षण ममता विद्यालय, गंगाखेड येथे पूर्ण केले. त्यानंतर नांदेड येथे बी. फार्मसीचे उच्च शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली.

गतवर्षी तिचा विवाह अक्षय शेटे परिवारात झाला. संसाराची जबाबदारी आणि कंपनीतील नोकरी सांभाळत तिने अभ्यासाची कास सोडली नाही. अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तिने केवळ यश मिळवले नाही, तर राज्यात मुलींमध्ये प्रथम येण्याचा बहुमानही मिळवला.

या यशाचे श्रेय तिने आई सुजाता साडेगावकर, भाऊ विकास साडेगावकर, काका बबन व संजय साडेगावकर, शिक्षकवर्ग तसेच सासू-सासरे व पती यांना दिले आहे. वैशालीची आई सुजाता साडेगावकर या गंगाखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

मराठी माध्यमातून शिक्षण घेत, ग्रामीण भागात वाढलेल्या विद्यार्थिनीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवणे ही गंगाखेडसाठी अभिमानाची बाब असून तिच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे. तिच्या या यशाबद्दल शहरातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT