Uddhav Thackeray vs Ajit Pawar
मानवत : कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती केली पाहिजे. कारण माफी गुन्हेगारांना दिली जाते. शेतकऱ्यांवर गेल्या शंभर वर्षांत एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती आली नव्हती. राज्यातील काही नेते शेतकऱ्यांना ‘फुकट काय मागता?’ जरा हातपाय हलवा, असे सांगत आहेत. पण ज्यांना फुकटात जमीन मिळाली, त्यांनी काय हलवले होते? असा टोला माजी मुख्यमंत्री व ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.
ठाकरे आज (दि.८) मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करत असलेल्या ठाकरे यांच्या ‘दगाबाज रे’ या संवाद यात्रेच्या निमित्ताने हा कार्यक्रम झाला.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, गुरे- ढोरे आणि शेळ्या मेंढ्या दगावल्या. तर अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले आहेत, अशा स्थितीत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा म्हणून कर्जमुक्ती केली नाही, तर मग कधी करणार? असा थेट सवाल ठाकरे यांनी केला.
या वेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार मीराताई रेंगे, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद अनेराव, रवींद्र धर्मे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख दिपक बारहाते आणि मानवत शहरप्रमुख अनिल जाधव उपस्थित होते.
ठाकरे पुढे म्हणाले, हे सरकार विकासाच्या नावाखाली फक्त काही निवडक उद्योगपतींचाच विकास करत आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत मिळाली पाहिजे आणि पूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे. जशी मोदी सरकारने नोटबंदी केली, तशीच जनतेने या महायुती सरकारसाठी ‘वोटबंदी’ करायला हवी.
या दगाबाज सरकारविरुद्ध लढा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे ठाम आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.