Two women who went for a morning walk were crushed to death
दैठणा, पुढारी वृत्तसेवा : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना अज्ञात चारचाकी वाहनाने उडविल्यामुळे महिलांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना परभणी-गंगाखेड रोडवर दैठणा पोखर्णी दरम्यानच्या गोलाई भागात गुरुवारी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुध्द दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उत्तमराव कच्छवे हे गुरूवारी सकाळी आपल्या पत्नी पुष्पाबाई कच्छवे फाट्याच्या दिशेने मॉर्निंग वॉकला गेले होते. पुष्पाबाई कच्छवे व अंजनाबाई शिसोदे या अलीकडे थांबल्या तर उत्तमराव कच्छवे हे काही अंतर पुढे गेले होते. याचवेळी गंगाखेडकडून परभणीच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने पुष्पाबाई कच्छवे व अंजनाबाई शिसोदे यांना जोराची धडक दिली. यात दोघींचाही जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भयंकर होता की अपघातानंतर मोठा आवाज झाल्याचे काही जणांनी सांगितले. अपघातात अंजनाबाई शिसोदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होत त्यांचा मेंदू बाहेर पडला होता. पुष्पाबाई कच्छवे यांच्या छातीला गंभीर मार लागला होता.
घटनेची माहिती बाळासाहेब कच्छवे, रामकिशन कच्छवे, मारोतराव कच्छवे यांनी दैठणा पोलिसांना दिली. अपघातानंतर रक्तामांसाचे तुकडे हे रोडवर विखुरले होते. मृतदेहाची विटंबना होऊ नये म्हणन शिवसैनिक विष्णू शिंदे यांनी सदरील विखुरलेले रक्तामासाचे तुकडे स्वतःच्या हाताने एकत्रित केले.
अपघातात दोन्ही मृत्युमुखी पडलेल्या महिलांचे परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अपघात प्रकरणी अज्ञात चालकाविरुध्द किशन डिगंबरराव कच्छवे यांच्या तक्रारीवरून दैठणा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सायंकाळी ४ वाजता पुष्पाबाई कच्छवे व अंजनाबाई शिसोदे यांच्यावर दैठण्याच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
७ महिन्यांत २० जणांचा मृत्यू
परभणी-गंगाखेड हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या रोडवर मागील ७ महिन्यांत २० जणांचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी आणि अवयव गमवावे लागलेल्या नागरीकांची संख्या तर त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आहे. या रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.