Two-wheeler skids due to asphalt work; Death of a young man
चारठाणा, पुढारी वृत्तसेवा जिंतूर-जालना रस्त्यावरील मालेगाव-खडकपाटी परिसरात सुरू असलेल्या डांबरीकरण कामा दरम्यान दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. सोमवारी (दि.५) दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ज्ञानेश्वर दत्तात्रय बुधवंत (वय ३५, रा. जांब बु.) असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर बुधवत हे सोमवारी दुचाकीवरून मालेगाव-खडकपाटी रस्त्याने प्रवास करीत होते. यावेळी या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू होते. रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांची दुचाकी अचानक घसरली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते रस्त्याच्या खाली जाऊन पडले.
या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या अन्य भागांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच सचिन आडे, सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात आणि खासगी रुग्णवाहिका चालक संतोष जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील ज्ञानेश्वर बुधवत यांना रुग्णवाहिकेतून जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलसुम खाजा यांनी तपासणी केली असता ज्ञानेश्वर बुधवत यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाइकांनी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. ज्ञानेश्वर यांच्या मृत्यूची वार्ता समजताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. ज्ञानेश्वर बुधवत यांच्या अकाली निधनामुळे जांब बु. गावावरही शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, अपघाताच्या वेळी रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना संबंधित ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच वाहनचालकांना पूर्वसूचना देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करणे आवश्यक असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. वृत्त लिहिपर्यंत या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.