Parbhani District Jail Triple Murder Accused Hanging
परभणी : परभणी तालुक्यातील असोला येथे आई, मावशी व काकाचा खून केल्याचा आरोप असलेल्या न्यायाधीन बंदीने शुक्रवारी (दि.२) पहाटे गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना घडली आहे. या प्रकाराने जिल्हा कारागृह प्रशासनात खळबळ माजली आहे.
राजू गोविंद अडकिने ( वय 35, रा.दारेफळ, ता. वसमत) याच्या विरोधात आई, मावशी, काकाचा खून केल्याच्या आरोपाखाली ताडकळस पोलीस ठाण्यात 302 चा गुन्हा दाखल होता. 21 मार्च 2022 पासून तो जिल्हा कारागृहात न्यायाधीन बंदी म्हणून दाखल होता. त्याच्यावर मनोविकार तज्ञाकडून उपचार सुरू होते.
शुक्रवारी पहाटे राजू अडकिने याने डायरेक्ट क्रमांक एक मधील बाथरूम च्या खिडकीला पांघरण्यासाठी देण्यात आलेल्या शॉल च्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे जिल्हा कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर खळबळ माजली असून जिल्हा सामान्य रुग्णालयात न्याय दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.