Parbhani Crime : परभणीत गावठी पिस्तुलासह तिघांना पकडले file photo
परभणी

Parbhani Crime : परभणीत गावठी पिस्तुलासह तिघांना पकडले

मध्यरात्री छापा; पिस्तुलासह विना नंबरची दुचाकी व मोबाईल जप्त, गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Three arrested with a country-made pistol in Parbhani

परभणी, पुढारी वृत्तसेवा: शहरातील अजीजिया नगर परिसरात अवैध शस्त्रांचा वापर करून गुन्हेगारी कारवायांना खतपाणी घालणाऱ्यां विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि. १८) मध्यरात्री धडक कारवाई करत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या कारवाईत एक गावठी पिस्तूल, पासिंग क्रमांक नसलेली दुचाकी आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला असून, तिघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी नेताजी गीत्ते यांच्या फिर्यादीवरून शेख साजीद शेख जाफर, शेख रिझवान शेख मुजीब आणि शेख इरशाद शेख याकुब उर्फ बाबा (सर्व रा. अजीजिया नगर, परभणी) यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना अजीजिया नगर परिसरात काही व्यक्ती अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगून संशयास्पद हालचाली करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरात सापळा रचत मध्यरात्री धडक छापा टाकला. संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी व झडती घेतली असता त्यांच्याकडून एक लोखंडी गावठी पिस्तूल, पासिंग क्रमांक नसलेली दुचाकी आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला.

चौकशीत संबंधित आरोपींकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले पिस्तूल आरोपींनी नेमके कुठून आणले, त्याचा वापर कोणत्या गुन्हेगारी कृत्यासाठी होणार होता, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणते रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या प्रकरणाचे आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, पोलीस उपनिरीक्षक सावंडकर, पोलीस हवालदार फड, महेश पांगरकर, पोलीस कर्मचारी नेताजी गीत्ते, पुरी आणि निलेश परसोडे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT