BJP NCP Pudhari
परभणी

Parbhani News : भाजपच्या प्रतिष्ठेची, तर राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई !

भांबळे-नागरे युतीचे आव्हान; जिंतूर-सेलूमध्ये महायुतीतच काटाजोड सामना

पुढारी वृत्तसेवा

This is a battle for the BJP's prestige, and for the NCP's very existence

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा :

राज्यात नुकत्याच नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांचा धुराळा खाली बसत नाही तोच, आता 'मिनी मंत्रालय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची, तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी (अजित पवार गट) अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. विशेष म्हणजे, राज्यात महायुती असली तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने येण्याची दाट शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या जिंतूर नगरपालिका निवडणुकीत भाजपने २१ पैकी १६ नगरसेवक निवडून आणत नगराध्यक्षपदासह एकहाती सत्ता मिळवली. शहरी भागातील मुस्लीम मतांचे गणित ओळखून भाजपने १२ मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरवण्याची चाल खेळली, जी यशस्वी ठरली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते माजी आ. विजय भांबळे आणि सुरेश नागरे यांची युती भाजपला रोखण्यात अपयशी ठरली. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेऊन मतविभाजन टाळण्याचे आवाहन केले होते, तरीही काँग्रेसचे शेख इस्माईल (सलीम पहेलवान) यांनी ४ नगरसेवक निवडून आणत आणि नगराध्यक्षपदासाठी ६,२९९ मते घेत राष्ट्रवादीच्या गणिताला सुरुंग लावला.

परिणामी, भाजपचे प्रताप देशमुख (१३,१२२ मते) विजयी झाले, तर राष्ट्रवादीच्या सबिया बेगम फारुकी (९,९५५ मते) यांना पराभव स्वीकारावा लागला. नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीला गळती लागली आहे. अशोक काकडे, मीना राऊत, अरुणा काळे यांसारख्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे, आमदार मेघना बोर्डीकर यांनी दुसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर मिळवलेला विजय आणि केलेली विकासकामे, यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.

राष्ट्रवादीचा गड भाजप भेदणार? जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे एकूण १५ गट आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत या १५ पैकी तब्बल १३ गटांवर विजय मिळवत माजी आ. विजय भांबळे यांनी एकहाती वर्चस्व सिद्ध केले होते. उर्वरित २ जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. ममता मते, उज्वला राठोड, इंदूबाई घुगे, अरुणा काळे, नमिता बुधवंत, संगीता घोगरे, मीनाताई राऊत, अजय चौधरी, शालिनी राऊत, रामराव उबाळे, राजेंद्र लहाने, अशोक काकडे आणि इंद्रायणी रोडगे हे राष्ट्रवादीचे शिलेदार विजयी झाले होते. मात्र, आता बदलेल्या राजकीय समीकरणात भाजप हा अभेद्य गड भेदणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT