The truck overturned while trying to avoid an accident.
परभणी, पुढारी वृत्तसेवा : समोरून येणाऱ्या कारसोबत होऊ शकणारा अपघात टाळण्याच्या प्रयत्नात लाकूडफाटा भरलेला ट्रक उलटल्याची घटना परभणी तालुक्यातील झरी येथे रविवारी (दि. २३) दुपारी एकच्या - सुमारास घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. - उलटलेल्या ट्रकचा क्रमांक एमएच २६ - बीई ९०१९ असा आहे. हा ट्रक - परभणीतून जिंतूरमार्गे गुजरातकडे लाकूडफाटा घेऊन जात होता.
झरी परिसरातील जिल्हा परिषद प्रशाळा चौकाजवळ समोरून येणाऱ्या कारला वाचवताना ट्रक चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. अपघातानंतर ट्रकमधील लाकूड रस्त्यावर विखुरल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. मात्र कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच परभणी ग्रामीण पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गर्दी नियंत्रणात ठेवत वाहतूक सुरळीत केली. तसेच क्रेनच्या साहाय्याने ट्रक हटविण्याची प्रक्रिया पार पाडली.