परभणी : जिल्ह्यात मागील काही महिन्यांमध्ये झालेल्या घरफोडीच्या वाढत्या प्रकारांवरून सुरू झालेल्या शोध मोहिमेत गुन्हा शाखेने दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा छडा लावला. तसेच या टोळीतील एकास ताब्यात घेतले.
दिनेश अंगद भोसले (रा. कासारी ता. आष्टी) असे या म्होरक्याचे नाव आहे. गुन्हे शाखा पथकाने घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी पथकास मिळालेल्या माहितीवरून दिनेश भोसले यास मंगळवारी (दि.८) ताब्यात घेतले. दिनेशने जिल्ह्यात दिवसा घरफोड्या केल्याची माहिती मिळाली होती. या आधारे पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यावर त्याने साथीदारांसह जिल्ह्यात दाखल होत १२ घरफोड्या केल्याची कबुली दिली. चोरीतील त्याच्या हिश्सातील माल त्याने पाटोदा येथील एका सोनाराला विकल्याचेही कबुल केले.
त्यामुळे संबंधित सोनारासही ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने चोरीचा माल घेतल्याचे सांगितले. त्याच्याकडून सोन्याचे दागिने व लगड असे एकूण ७० ग्रॅम सोने जप्त केले. हा गुन्हा करताना दिनेशने वापरलेली होंडा मोटारसायकल (क्र. एमएच २३ बी के ८५४२) जप्त केली असून एकूण ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत झाला. गुन्ह्यांत ताडकळस व नवा मोंढा ठाण्यांसह दैठणा ठाण्यांतर्गत ३, गंगाखेड अंतर्गत ३ तर पूर्णा, पालम, चुडावा, मानवत अंतर्गत प्रत्येकी एक गुन्हा केला होता. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू असून परभणीसह अहमदनगर, बीड या जिल्ह्यातही घरफोडीचे गुन्हे त्याच्याविरूद्ध दाखल झाले. त्यामुळे आणखी गुन्हे उघडकीस येतील.