बोरी ः जिंतूर तालुक्यातील बोरी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा गुरुवारी (दि.19) रात्रीच्या वेळी बसविण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा पुतळा बसविण्यात आल्याचे संबंधित युवकांचे म्हणणे आहे. मात्र पुतळा अधिकृत की अनधिकृत, याबाबत प्रशासनाने अद्याप स्पष्ट भूमिका घेतली नसल्याचे समजते, पण युवकांनी याबाबतचा ग््राामसभेचा ठराव असल्याचे सांगितले.
बोरी गावातील काही युवकांनी सांगितले की, याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्यासाठी पूर्वनियोजित जागा निश्चित करण्यात आली असून ग््राामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र देखील उपलब्ध आहे. त्यामुळेच पुतळा बसविण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र प्रशासनाकडून कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली असून, सर्व बाबींची खातरजमा केल्यानंतरच पुतळ्याच्या अधिकृततेबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पुतळा उभारला जात असल्याची माहिती मिळताच बोरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
बेकायदेशीर पुतळा बसविण्यात येत असल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी जमावास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी बेनिवाल व नंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक गुंजाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, बोरीचे निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्यासह राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या व अतिरिक्त पुढील बंदोबस्त घटनास्थळावर मध्यरात्रीच दाखल झाला होता.
दरम्यान झालेल्या गोंधळात पोलिस जमादार दिलावर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर प्रथम बोरी ग््राामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी परभणी येथे पाठविण्यात आले. या प्रकरणात तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळी झालेल्या व्हिडिओ चित्रीकरण व छायाचित्रांच्या आधारे इतरांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तपासादरम्यान आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
दरम्यान गावात घटनेबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असून पुतळा अधिकृत की अनधिकृत याबाबत प्रशासनाचा अंतिम निर्णय काय येतो, याकडे ग््राामस्थांचे लक्ष लागले आहे. घटनेमुळे बोरी परिसरात सध्या पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान शुक्रवारी (दि.20) सायंकाळी घटनास्थळावर ठसे तज्ञांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
आज बोरी बंदचे आवाहन
बोरी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याच्या कारणावरून पोलिस जमादार दिलावर यांनी उपस्थित महिलांसमवेत गैरवर्तन केले. तसेच युवकांशी वाद घालत प्रकरण चिघळवले, असा आरोप सुशील मीडियावरील व्हिडिओमधून करण्यात येत आहे. दिलावर यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी बोरीवासीयांच्या वतीने शनिवारी कडकडीत बोरी बाजारपेठ बंदचे आवाहन करण्यात आले आहे.