Parbhani News : ब्राह्मणगाव ते तरोडा दरम्यान बोलेरोच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू File photo
परभणी

Parbhani News : ब्राह्मणगाव ते तरोडा दरम्यान बोलेरोच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; दैठणा गावावर शोककळा

पुढारी वृत्तसेवा

Teacher dies in Bolero collision between Brahmangaon and Taroda

दैठणा, पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी (दि.७) रात्री ८.४५ च्या सुमारास परभणीवरून दैठण्याकडे निघालेल्या शिक्षकाचा बोलेरो पिकअपच्या धडकेत मृत्यू झाला आहे. या घटनेने दैठणा गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

दैठणा येथील गुरुकूल इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानोबा कच्छवे हे ७ एप्रिल रोजी सायंकाळी शैक्षणिक कामानिमित्त दुचाकी (क्रं. एम.एच.२२ ए.के. २०७०) वरून परभणीला आले होते. काम उरकून रात्री ८.४५च्या सुमारास गावाकडे परतत असताना ब्राम्हणगाव ते तरोडा दरम्यान वेगात येणाऱ्या बोलेरो पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत ज्ञानोबा कच्छवे हे गंभीर जखमी होत रस्त्याच्या कडेला पडले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही झाला होता.

याचवेळी परभणीवरून दैठणा गावाकडे काही युवक जात होते. अपघाताची माहिती समजताच त्यांनी ज्ञानोबा कच्छवे यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी दैठणा येथील स्मशानभूमीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच भाऊ, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे. ज्ञानोबा कच्छवे दैठणा व पंचक्रोशीमध्ये विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचीत होते.

अनेक विद्यार्थ्यांना वरिष्ठ अधिकारी बनविण्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. दैठणा सारख्या ग्रामीण भागात गुरूकुल इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचे रोपटे लावत आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला असतानाच त्यांचे अपघाती निधन दैठणा गावासह पंचक्रोशीतील नागरिकांना चटका लावून जाणारे ठरले आहे.

परभणी-गंगाखेड ७५२ राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास १५ जणांना जीव गमवावा लागला आहे. या शिवाय दैठणा पोलीस ठाण्याची हद्द सोडून परभणी ग्रामीण व गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दैठणा गाव राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस असल्यामुळे रस्ता ओलांडताना अपघात होऊन अनेकांना दुखापतही झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अनुसयाबाई कच्छवे या महिलेस राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे त्या गंभीर जखमी असून परभणीच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT