परभणी : पूर्णा तालुक्यातील ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सोयाबीन खरेदी करूनही शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे पैसे थकविल्याच्या प्रकरणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी परभणी येथील उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले.
संबंधित व्यापाऱ्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा, बाजार समितीतील त्याचा परवाना व दुकानाचा फेर रद्द करावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली. उपनिबंधकांनी बाजार समितीच्या सचिवांना तातडीने कारवाईचे लेखी निर्देश दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ताडकळस बाजार समिती आवारात श्रीपाद ट्रेडिंग कंपनीच्या संचालकाने मागील हंगामात परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची खरेदी केली होती. काही शेतकऱ्यांना किरकोळ रक्कम अदा करण्यात आली, मात्र बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे अद्यापही मिळालेले नाहीत. वारंवार मागणी करूनही व्यापाऱ्याने पैसे न दिल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रारी केल्या. त्यानंतर सुमारे महिनाभरापूर्वी उपनिबंधकांकडेही लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र संबंधित व्यापाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला.
यावर्षी अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम संकटात सापडला असून पेरणी केलेली पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. अशा कठीण परिस्थितीत मागील वर्षी विकलेल्या सोयाबीनचे पैसेही न मिळाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अडचणीत आले. संबंधित व्यापारी कुटुंबासह फरार झाल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला. तसेच बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्याला पाठीशी घातल्यामुळेच कारवाईला विलंब झाल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे धाव घेतली. त्यानंतर संघटनेचे पदाधिकारी व शेकडो शेतकरी परभणी येथील उपनिबंधक कार्यालयात दाखल झाले आणि तीन तास ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलना दरम्यान प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
संबंधित व्यापाऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी लावून धरली. आंदोलनाची दखल घेत उपनिबंधकांनी ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना तातडीने पत्र देऊन संबंधित व्यापाऱ्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच बाजार समितीतील व्यापाऱ्याचे दुकान व संबंधित परवान्याबाबत आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तात्पुरते स्थगित केले. यावेळी संघटनेने प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला.
या कालावधीत व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल झाला नाही अथवा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या पद्धतीने तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा देण्यात आला. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, मुंजा लोडे, माऊली शिंदे, राम गोळेगावकर, भगवान अंभोरे, मुंजा अंभोरे, गजानन अवरगंड, जनार्धन होणमाने यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.
'पाच ते सहा कोटीच्या फसवणुकीचा आरोप'
ताडकळस परिसरातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करून संबंधित व्यापाऱ्याने सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते किशोर ढगे यांनी केला. जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मालाचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नाही. गरज पडल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.