स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून परभणीत अर्थसंकल्पाची होळी pudhari photo
परभणी

Swabhimani Shetkari Sanghatana protest : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून परभणीत अर्थसंकल्पाची होळी

मुख्यमंत्र्यांनी सातबारा कोरा करण्याचा शब्द न पाळल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

परभणी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थ संकल्पाची होळी सोमवारी (दि.9) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदानावर करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करतो म्हणणारे आज अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना फक्त 2 लाखांपर्यंतचेच कर्ज सरकार माफ करणार. आणि त्यासाठीही पात्र व अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे सांगत आहेत. सुरळीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त 50 हजार देणार अशी तूट पूंजी मदत शेतकऱ्यांना होणार असून हा अर्थसंकल्प शेतकरी हिताचा नसून शेतकऱ्यांना मारक असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे.

मराठवाड्यात रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून या वाढणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अर्थसंकल्पात काहीच तरतूद न केल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले. भाजप सरकारने 15 वर्षापासून सातत्याने शेतमालाचे भाव पाडण्याचेच काम केले. त्यात सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, मका यांसारख्या पिकांचा समावेश आहे. केंद्र सरकार पिकांचा हमीभाव जाहीर करते, तोही पिकांचा उत्पादन खर्च भरून काढत नाही.

केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कधीच मिळत नाही. हमीभावापेक्षा एक ते दीड हजारांनी शेतमाल विकावा लागतो. त्यामुळे मराठवाड्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. संपूर्ण सातबारा कोरा करू म्हणणारे आज फक्त पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमुक्ती देतो म्हणत आहेत.

आजतागायत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी झुलवत ठेवले आणि जेव्हा कर्जमुक्ती द्यायची वेळ आली, त्यातही सरकार अटीशर्ती घालत पात्र, अपात्र ठरवत आहे. सरकारची चालाकी असून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा चालविल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेने केला. याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2026 चा जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाची स्वाभिमानीकडून होळी करण्यात आली. यावेळी स्वाभिमानीचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे, पी.टी.निर्वळ, कलीमभाई कोक्कर, मुंजाभाऊ लोडे, आदिनाथ लवंदे, हनुमान आमले, किशन शिंदे, विठ्ठल चोखट, गजानन ढगे, लक्ष्मण चव्हाण आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT