परभणी : मागील चार दशकापासून जिल्ह्याच्या राजकारण, समाजकारणात ठसा उमटविणारे माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणातील वलयांकीत नेतृत्व होय. विद्यार्थी दशेपासूनच विविध आंदोलनाच्या माध्यमातून सुरेश वरपुडकरांचे नेतृत्व विकसीत होत गेले.
मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या निर्मिती आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग राहीलेला आहे. कृषी पदवीधर असलेल्या सुरेश वरपुडकरांचा राजकीय प्रवेश खर्या अर्थाने 1986 साली झाला. तत्कालीन सिंगनापुर विधानसभा मतदार संघाचे आ. बालासाहेब दामपुरीकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोट निवडणुकीमध्ये सुरेश वरपुडकर प्रथमच विधानसभेमध्ये पोहचले.
1986 ते 1998 या कालावधीत त्यांनी तीन वेळेस तत्कालीन सिंगनापूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व केले. 1998 ला सुरेश वरपुडकरांनी लोकसभेची निवडणुक लढवत ते 13 महिन्यासाठी खासदारही राहीले. मागील चार दशकाच्या कालखंडात पाच वेळा आमदारकी तर एक वेळा त्यांनी खासदारकी मिळविली. 2004 ला पाथरी विधानसभा मतदार संघातून त्यांनी विमान या निवडणुक चिन्हावर निवडणुक लढवत ते पुन्हा एकदा विधानसभेत पोहचले.
तत्कालीन काँग्रेस सरकारने सुरेश वरपुडकरांना सहा महिन्यासाठी का होईना राज्यमंत्रीपद बहाल केले होते. 2009, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वरपुडकर यांना पराभव स्विकारावा लागला होता. 2019च्या विधानसभा निवडणूकीत पाथरी विधानसभा मतदार संघातुन विजय मिळवत ते पुन्हा विधानसभेमध्ये पोहचले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव पत्करावा लागल्यानंतर सुरेश वरपुडकरांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या. अखेर 29 जुलै रोजी त्यांनी मुंबई येथील भाजपा पक्ष कार्यालयात भाजपमध्ये रितसर प्रवेश केला. सत्तेत असो अथवा नसो कार्यकर्त्यांचे मोहळ पाठीशी असलेले सुरेश वरपुडकर म्हणजे जिल्ह्यातील एक वलयांकीत नेतृत्व होय.