पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कंठेश्वर शेतशिवारात दि. २१ फेब्रुवारी रोजी विद्युत वहन तारांमध्ये अचानक शॉटसर्किट झाले. शेतात कृषी पंपासाठी महावितरण उपविभाग, पूर्णा ग्रामीण खात्याअंतर्गत विद्युत खांबावर बसवण्यात आलेल्या तारा मागील अनेक दिवसांपासून लोंबकळत होत्या.
शनिवारी दुपारी या विद्युत वहन चालू तारांमध्ये अचानक शॉटसर्किट घडून आले. तारांतील घर्षणातून ज्वालांची ठिणगी उडून फडात पडली आणि तोडणीच्या तयारीत असलेला दीड एकर ऊस आगीत भस्मसात झाला.
या घटनेत कंठेश्वर शिवारातील शेतकरी उत्तम रावसाहेब कदम (गट क्रमांक १०८) यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मागील काही दिवसांपासून शॉटसर्किटच्या घटना सातत्याने घडत असून ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला आहे.
तरीदेखील महावितरणचे अभियंते गांभीर्याने दखल घेत नसून वाकलेले खांब, जुने, जीर्ण आणि लोंबकळलेले विद्युत तारे दुरुस्त करण्यात येत नाहीत. परिणामी, शॉटसर्किटच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उभे ऊस जळून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
संबंधित शेतकरी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाकलेले खांब, जीर्ण झालेले तसेच लोंबकळलेले विद्युत तारे नवीन करून दुरुस्त करावेत, यासाठी वारंवार निवेदने देत आहेत तसेच तोंडीही सूचना देत आहेत.
मात्र त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. उलट विजबिल थकबाकीचे कारण सांगून अभियंते जबाबदारी झटकत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
यामुळे शेतकऱ्यांना कोणीही वाली राहिलेला नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणीही यावे आणि शेतकऱ्यांच्या कपाळी टिकली मारून जावे, अशी अवस्था झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.