Illegal Transport : बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर एसटीचा चाबूक file photo
परभणी

Illegal Transport : बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर एसटीचा चाबूक

नो-पार्किंग झोनमध्ये दोन दिवसांत ५० ते ६० वाहनांवर दंडात्मक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

ST cracks down on illegal transport in the bus station area

परभणी, पुढारी वृत्तसेवा : बसस्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रवाशांना होणारा त्रास आणि अवैध प्रवासी वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना आळा घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने कठोर पावले उचलली. परभणी विभागात बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरातील नो-पार्किंग झोनमध्ये उभ्या राहून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलिसांच्या मदतीने दोन दिवसांत ५० ते ६० वाहनांवर कारवाई करण्यात आली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी डॉ. नारनवरे यांच्या निर्देशानुसार राज्यभर अवैध प्रवासी वाहतुक विरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली. यानुसार परभणी विभागातही सुरक्षा दक्षता पथकांना सक्रिय करण्यात आले. विभाग नियंत्रकांनी विभागातील सर्व आगार व्यवस्थापक, सहायक वाहतूक अधीक्षक आणि वाहतूक निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील बसस्थानक परिसरात विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले.

बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहने उभी करून प्रवाशांची अवैध वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. यामुळे बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होण्यासह एसटी बसच्या आवागमनालाही अडथळे येत होते. या पार्शवभूमीवर विभागीय सुरक्षा दक्षता पथकांनी विविध बसस्थानकांवर अचानक भेटी देत स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त कारवाई सुरू केली.

नो-पार्किंग झोनमध्ये उभ्या वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मोहिमेमुळे बसस्थानक परिसरातील वाहतुकीत शिस्त निर्माण होण्यास मदत होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांतच ५० ते ६० वाहनांवर कारवाई करण्यात आली, पुढील आठवडाभर ही मोहीम अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार आहे.

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर तसेच नो-पार्किंग झोनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा परभणी विभागाचे सुरक्षा दक्षता अधिकारी अ.ल. काळबांडे यांनी दिला आहे. काळबांडे यांनी सांगितले, बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे, एसटी प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चत करणे आणि अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT