MSRTC Bus Stand | बसस्थानक परिसरात २०० मीटरपर्यंत ‘नो पार्किंग झोन’ : अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई

अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात एसटीची धडक मोहीम राबवणार: सुरक्षा दक्षता अधिकारी काळबांडे
MSRTC Bus Stand No Parking Zone
No Parking ZonePudhari
Published on
Updated on

MSRTC Bus Stand No Parking Zone

जिंतूर : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नाला फटका देणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व प्रमुख बसस्थानकांच्या परिसरात अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जाणार आहे. बसस्थानकापासून २०० मीटरपर्यंतचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. ही मोहीम ५ जून ते १५ जून या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक तसेच एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलीस उप महानिरीक्षक डॉ. नारनवरे, यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत खासगी वाहनांद्वारे होत असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाच्या महसुलात मोठी घट झाली आहे. तसेच अशा वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.

MSRTC Bus Stand No Parking Zone
Parbhani News : परभणीत एफडीएची मोठी कारवाई; ३.४७ लाखांचा नियमबाह्य अन्नसाठा जप्त

या मोहिमेदरम्यान बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात थांबून प्रवासी उचलणाऱ्या किंवा अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांच्या मदतीने दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

परभणी विभागातील जिंतूर, परभणी, सेलू, पाथरी, मानवत, वसमत, हिंगोली, कळमनुरी आदी प्रमुख बसस्थानकांच्या परिसरातही ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. बसस्थानकाबाहेर प्रवासी गोळा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, अशा वाहनांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे.

परभणी विभागाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. विभागातील अधिकारी, पर्यवेक्षक, आगार प्रशासन आणि स्थानिक पोलीस यांचे संयुक्त पथक कारवाई करणार असून, अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

MSRTC Bus Stand No Parking Zone
Parbhani News | सरपंचाने विनापरवाना कानडखेड येथील ग्रा.पं. कार्यालय पाडले; बांधकाम साहित्यही गायब

एसटी प्रशासनाने प्रवाशांनाही आवाहन केले असून, अधिकृत एसटी सेवेलाच प्राधान्य द्यावे आणि सुरक्षित प्रवासासाठी अनधिकृत वाहनांचा वापर टाळावा, असे सांगितले आहे. या विशेष मोहिमेमुळे बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एसटीचे उत्पन्न वाढविणे, प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे तसेच अनधिकृत प्रवासी वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणणे. हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक पोलीस व आगार प्रशासनाच्या सहकार्याने नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल

- अ.ल.काळबांडे, सुरक्षा व दक्षता अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news