Parbhani Selu Road St Bus Overturn Pudhari
परभणी

Parbhani Bus Accident | परभणी - सेलू मार्गावर शिवशाही बस पलटी; पाच प्रवासी जखमी

पानेरा पाटीजवळ अपघात; बसमध्ये १९ प्रवासी, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

पुढारी वृत्तसेवा

Parbhani Selu Road St Bus Overturn

मानवत : परभणीहून सेलूकडे जाणारी परभणी आगाराची शिवशाही एसटी बस पानेरा शिवारात रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना शनिवारी (दि. १७) सकाळी घडली. पानेरा पाटीजवळ रईस वीटभट्टीसमोर सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात पाच प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बसमध्ये एकूण १९ प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी आगाराची शिवशाही बस (क्र. एमएच ०९ ईएम २२५१) परभणी येथून सेलूच्या दिशेने जात होती. पानेरा शिवारातील रईस वीटभट्टीसमोर बस आली असता ती अचानक रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या तसेच जखमी झालेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मदत केली. या अपघातात पाच प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त असून, त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, बस नेमकी कोणत्या कारणामुळे पलटी झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चालकाचा बसवरील ताबा सुटला, रस्त्याच्या परिस्थितीमुळे अपघात झाला की बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता, याबाबत स्पष्टता झालेली नाही. संबंधित यंत्रणांच्या तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.

अधिक भाडे, तरी सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर

शिवशाही बसमधून प्रवास करण्यासाठी साध्या एसटी बसच्या तुलनेत अधिक भाडे आकारले जाते. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची अपेक्षा असते. मात्र, शिवशाही बसच्या अपघातांच्या घटना घडत असल्याने या बससेवेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

बसची नियमित देखभाल व दुरुस्ती, वाहनांची तांत्रिक तपासणी, चालकांची दक्षता आणि प्रवासादरम्यान सुरक्षिततेच्या नियमांचे पालन या बाबींना प्राधान्य देण्याची गरज आहे. अधिक भाडे आकारले जात असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पानेरा शिवारातील या अपघाताची सखोल चौकशी करून कारण स्पष्ट करावे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT