Soybean fields have withered; Kharif season at risk
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : तालुका परिसरात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जमिनीतील ओलावा संपत चालल्याने जिकडे पाहावे तिकडे सोयाबीनची पिके सुकून वाळताना दिसत आहेत. ऐन फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीनसह मूग, उडीद, कापूस व तूर पिकांनाही मोठा फटका बसला आहे. अनेक शेतांतील पिकांनी माना टाकल्याने यंदाचा खरीप हंगाम हातचा जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झालेला नाही. अल्पशा पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या. मध्यंतरी अधूनमधून हलक्या सरी कोसळल्याने पिकांनी कशीबशी तग धरली. मात्र, पिके ऐन फुलोऱ्यात आली आणि शेंगा लागण्यास सुरुवात झाली असतानाच पावसाने पुन्हा उघडीप दिली. परिणामी जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला.
फुले व शेंगा करपून गेल्याने सोयाबीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. सध्या परिसरात मे महिन्यातील उन्हाळ्यासारखा कडक उन्हाळा जाणवत आहे. दिवसभर सूर्य आग ओकत असून जमिनी अक्षरशः तापून निघाल्या आहेत. पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पावसासाठी गावोगावी धोंडी काढणे, देवदेवतांना साकडे घालणे असे पारंपरिक उपायही सुरू झाले आहेत. मात्र, अद्याप वरुणराजाची कृपा झालेली नाही. पावसाने दडी मारल्याने विहिरी व बोअरवेलची पाणीपातळीही झपाट्याने खालावत आहे. पावसाचा आणखी खंड पडल्यास आगामी काळात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर जनावरांसाठी चारा व वैरणीचा प्रश्नही गंभीर होण्याची भीती आहे. पिकांची सद्यस्थिती पाहता अनेक शेतकऱ्यांना पेरलेल्या बियाण्याएवढेही उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे चित्र आहे. उत्पादन खर्च, बियाणे, खते, मशागत आणि कर्जाचा भार शेतकऱ्यांच्या डोक्यावर कायम असताना पिके हातची जात असल्याने आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.
खरीप पिके सुकून वाळत असताना महसूल व कृषी विभागाकडून अद्याप पंचनाम्याचे आदेश आले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. तालुका व जिल्हा प्रशासनाकडे निवेदने देऊन तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. पिके पूर्णपणे उध्वस्त झाल्यानंतर पंचनामे करण्यापेक्षा सद्यस्थितीची तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त क्षेत्र निश्चित करावे आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
मागील खरीपात सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 मध्ये अतिवृष्टीने सोयाबीनसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले होते. काही भागातील पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली तर अनेक ठिकाणी अतिवृष्टीने पिके उध्वस्त झाली.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत विमा हप्ता भरलेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप भरपाई न मिळाल्याची तक्रार आहे. एकीकडे गतवर्षीच्या पीकविम्याची भरपाई रखडलेली असताना दुसरीकडे यंदाचा खरीपही पावसाअभावी धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. शासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन पीकविमा भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
बैल पोळ्यावरही संकटाची छाया
गतवर्षी अतिवृष्टीने खरीप हंगाम उध्वस्त झाला; तर यंदा पावसाच्या खंडाने खरीप पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. या दुहेरी नैसर्गिक संकटामुळे यंदाच्या 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैल पोळा सणावरही दुष्काळाचे सावट आले आहे. शिवारात वाळून चाललेली पिके पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणीसाठी व्यापारी व खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे, घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्यावरील खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करून पिकांचे पंचनामे, नुकसान भरपाई आणि रखडलेली पीकविमा भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.