आनंद ढोणे
पूर्णा : पूर्णा तालुक्यातील शेतशिवारात यंदा खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीनसह तूर, मुग, उडीद, कापूस या पिकांनी माना टाकल्या आहेत. मागील महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने जमिनीतील ओल संपली असून, वाढीस लागलेली पिके कोमेजून गेली आहेत. भर पावसाळ्यात कडक उन्हाळा जाणवत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
यंदा जून ते जुलै महिन्यात पूर्णा तालुक्यात केवळ ६२ टक्केच सरासरी पाऊस झाला. मे महिन्यात अवकाळी पावसाने थोडी मदत केली, पण खरीप पेरण्या अल्पशा ओलीवरच उरकाव्या लागल्या. त्यानंतर पावसाचा खंड पडल्याने पिकांची वाढ थांबली. जमिनी कोरड्या पडल्या असून पिके करपू लागली आहेत. बराच काळ पाऊस न झाल्याने जमिनी भेगाळल्या आहेत. सध्या सोयाबीन, मुग, उडीद या पिकांनी माना टाकल्या असून, हातची पिके वाया जाण्याची वेळ आली आहे.
यंदा पिक विमा योजनेत बदल करण्यात आले आहेत. पूर्वी १ रुपयात मिळणारा विमा बंद झाला असून, आता सोयाबीनसाठी हेक्टरी ११६० रुपये हप्ता भरावा लागतो. तसेच, नुकसानभरपाई फक्त कापणीवेळीच मिळणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
सोयाबीन: ३४,५८० हेक्टर
कापूस: ६,१९० हेक्टर
तूर: १,९५८ हेक्टर
मुग: ५०८ हेक्टर
उडीद: १७५ हेक्टर
मका: २८ हेक्टर
ख. ज्वारी: ४ हेक्टर पेरणी झाली अशी माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी दिली.
पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकरी पंढरीच्या पांडुरंगाकडे पावसासाठी प्रार्थना करत आहेत. कोरड्या दुष्काळाचे सावट गडद होत चालले असून, खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.