पूर्णा : नांदेड रेल्वे स्थानकावरून अमृतसरकडे धावणा-या सचखंड या जलदगती एक्सप्रेस मधील वातानुकूलित डब्यातून शुक्रवारी (दि.३१) अचानक धुर निघाला. ही घटना चुडावा-लिंबगाव स्टेशन लोहमार्ग दरम्यान घडली. धुर निघाल्याने रेल्वेने पेट घेतला की काय? म्हणून रेल्वेतील प्रवासांची तारांबळ उडाली. मात्र थंडीच्या दिवसात रेल्वे चाकावरील ब्रेक लायनर अडकून घर्षण तयार होऊन हा धूर निघत असल्याचा निर्वाळा रेल्वे तज्ञांनी व्यक्त केला. दरम्यान, या घटनेत रेल्वे डब्यात आग वगैरे काही लागली नसल्याची खात्री पटल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
वातानुकूलित दोन डब्यातून हा धुर निघत होता. धूर निघू लागल्याने डब्यातील प्रवाशाने प्रसांगवधान राखून चैन ओढून गाडी थांबवली अन् प्रवासी रेल्वेतून उतरले. गाडी थांबल्यानंतर रेल्वे तांत्रिकांनी त्वरित पाहणी करुन झालेला प्रकार तपासला असता ब्रेक लायनर घर्षणामुळे धुर निघाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तांत्रिक तज्ञांनी जाम झालेले ब्रेक लायनर खुले केले.त्यानंतर धुर थांबला. या घटनेमुळे सचखंड एक्सप्रेस चुडावा रेल्वे स्टेशनवर १५ ते २० मिनिटे थांबवल्याची माहिती आहे. नंतर रेल्वे दिल्ली अमृतसरकडे रवाना करण्यात आली. या घटनेत कुठलाही हानी झाली जरी नसली तरी प्रवाशात मात्र एकच घाबरगुंडी उडाली होती.