Shinde Sena eyes Thackeray's stronghold
परभणी : सुभाष कच्छवे
१९८९ पासून आज-तागायत शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या परभणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष दिले असून परभणीची जमीन आपल्यासाठी कशी भुसभुशीत होईल असा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. १९८९ पासून १९९८ या काळात १३ महिन्याचा कालखंड वगळता परभणी लोकसभा व परभणी विधानसभा मतदारसंघावर कायमच शिवसेनेचा वरचष्मा राहिलेला आहे.
शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देण्यात परभणीचा मोलाचा वाटा राहिल्यामुळे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचेही परभणी वर विशेष प्रेम असल्याचे वारंवार दिसून आलेले आहे. खा. संजय जाधव यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर 7 जुलै रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते, शहरात शिंदें यांच्या स्वागतासाठी फलकही लावण्यात आले होते, परंतु अचानक दौरा रद्द झाल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.
नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खा. संजय जाधव यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शहरात निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा घेऊन पर-भणीकर ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. शहरातील स्टेडियम मैदानावर शिंदे यांच्या शिवसेनेने मेळावा आयोजित करून शेतकरी संवाद दौऱ्याच्या नावाखाली शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता. एकंदरीत परभणीची जमीन आपल्यासाठी कशी भुसभुशीत होईल यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा प्रयत्न राहणार आहे.
खा. संजय जाधव यांना पक्षात घेऊन शिंदे यांनी परभणीत आपली ताकद वाढविला वाढविण्यासाठी प्रयत्न केला आहे. सईद खान यांच्या रूपाने शिंदेंना विधान परिषदेचा आमदारही मिळाला आहे. आपण कुठलाही पक्ष बदलला नसून आपण वंदनीय शिव-सेनाप्रमुखांच्या शिवसेनेत आल्याचे सांगत खा. संजय जाधव जनतेतून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना मागील निवडणुकीचा अपवाद वगळता आजतागायत धनुष्यबाण चिन्हावरच लढल्याचे सांगत आपण पुन्हा धनुष्यबाणाकडे आल्याचे खा. जाधव सांगत आहेत. महायुतीतील शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व व भाजप हे मित्रपक्ष असले तरी आगामी काळात या तीन प्रमुख पक्षांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगण्याचे संकेत मिळत आहेत.
पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी खा. संजय जाधव यांना भाजपामध्येच प्रवेश करायचा होता अशी गुगली टाकून खा. जाधव यांना डिवचले आहे, त्याला खा. जाधव यांनी उत्तर दिल्या असून आपण कधीही भाजप नेत्यांच्या संपर्कात नव्हतो. आपल्या भाजपाप्रवेशाविषयी बोलणाऱ्यांनी पुरावा द्यावा असे आव्हान ही त्यांनी दिले आहे. एकंदरीत ठाकरेंच्या बालेकिल्ल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नजर असून आगामी काळात महायुतीतील तीनही पक्षामध्ये आगामी काळात परभणी मध्ये राजकीय कलगीतुरा रंगणार असल्याचे संकेत मिळत आहे.