Parbhani Hingoli MLC election : विधान परिषद निवडणूक; समाज माध्यमांवर रंगली चर्चा

परभणी : भाजपासह शिंदेंची शिवसेना नेटकऱ्यांकडून केली लक्ष्य
 MLC Election
MLC Electionpudhari photo
Published on
Updated on

परभणी : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान या मुस्लिम चेहऱ्याला संधी दिल्यानंतर समाज माध्यमावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह भाजपाचाही नेटकऱ्यांनी खरपूस समाचार घेतल्याचे दिसून येत आहे.

परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परभणी लोकसभा व परभणी विधानसभा मतदार संघावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सय्यद इकबाल या मुस्लिम चेहऱ्याला महापौरपदी बसविल्यानंतर राज्यभरात भाजप व शिंदेच्या शिवसेनेने शिवसेना (उबाठा) पक्षावर आगपाखड करत ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंदुत्व नकली असल्याचा आरोप केला होता. भाजप व शिंदेच्या शिवसेनेच्या राज्य पातळीवरील नेत्यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता.

 MLC Election
Parbhani Hingoli MLC Election : ठाकरे सेनेकडून डॉ. नावंदर रिंगणात उतरणार

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेने सईद खान यांच्या रुपाने अल्पसंख्याक चेहरा निवडणूक रिंगणात उतरवल्यानंतर शिंदेंची शिवसेना व भाजप विरुद्ध नेटकरी मंडळी समाज माध्यमांवर जोरदार आगपाखड करताना दिसून येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुस्लिम उमेदवार दिल्यानंतर ‌‘थयथया नाचणारे आता कुठे गेले आहेत‌’, असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत.

हिंदुत्वाची भाषा बोलणारी भाजप व शिंदेंच्या शिवसेनेची मंडळी आता सईद खान यांचा प्रचार करणार काय ? असा खोचक सवाल उपस्थित करत आहेत. महापालिका निवडणुकीत सय्यद इकबाल यांना महापौरपदी बसविल्यानंतर खा. संजय जाधव व आ.डॉ. राहुल पाटील यांच्यावरही भाजप व शिवसेनेच्या मंडळीने तोंडसुख घेत त्यांना लक्ष केले होते. भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनीही विधान परिषद निवडणुकीत मुस्लिम चेहरा दिल्यावरून आपली भूमिका स्पष्ट करावी, असे नेटकरी सुचवत आहेत. एकंदरीत परभणीत लोकसभा-विधानसभा निवडणुकीत खान पाहिजे की बाण अशी चर्चा सातत्याने होत रहायची.

विधान परिषदेची होऊ घातलेली निवडणुक प्रारंभी तरी जाती-पाती मध्ये गुरफटल्याचे दिसून येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुस्लिम महापौर केल्यानंतर ओरड करणारे तथाकथीत हिंदुत्वावादी आज कुठे गेले आहेत. ‌‘ठाकरेंच्या महापौराला विरोध करणारे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सईद खान यांना हाच न्याय लावतील काय‌’? असा सवालही उपस्थित करत आहेत. अनेकांनी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यावरही जोरदार टिका केली आहे.

काही जणांनी ‌‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आता कुठे गेले‌’? असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. प्रारंभी जाती-पातीमध्ये गुरफटलेली विधान परिषदेची निवडणूक मतदान जसे जसे जवळ येईल, तशी कोण्या वळणावर पोहंचणार या विषयी तुर्तास सांगणे अवघड असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत विधान परिषदेच्या निवडणुकीवरून समाज माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news