Crime News Pudhari
परभणी

Shelgaon Murder Case | शेळगाव खून प्रकरणाचा उलगडा! पैशाच्या वादातून हत्या; चौघे ताब्यात

Shelgaon Murder Case | तालुक्यातील शेळगाव येथील २३ वर्षीय महारुद्र व्यंकटराव शिंदे यांच्या अपहरण व खून प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

  • शेळगाव येथील २३ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणाचा उलगडा

  • पैशाच्या वादातून अपहरण करून हत्या केल्याची कबुली

  • चार जण ताब्यात; त्यात एका विधी संघर्ष बालकाचा समावेश

  • मृतदेह इंजेगाव शिवारातील विहिरीत आढळला

  • आरोपींना ११ मेपर्यंत पोलीस कोठडी

सोनपेठ : तालुक्यातील शेळगाव येथील २३ वर्षीय महारुद्र व्यंकटराव शिंदे यांच्या अपहरण व खून प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यामध्ये एक अल्पवयीन गुन्हेगाराचाही समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

महारुद्र शिंदे हे काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याची तक्रार सोनपेठ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. दरम्यान, २९ एप्रिल रोजी परळी तालुक्यातील इंजेगाव शिवारात कालव्यालगत असलेल्या विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. तपासात हा मृतदेह महारुद्र शिंदे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि सोनपेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत पैशाच्या व्यवहारातून वाद झाल्याचे उघड झाले.

तपासादरम्यान अभिजीत चव्हाण, कृष्णा राठोड, मंथन डुकरे आणि एका अल्पवयीन गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी महारुद्र याचे अपहरण करून त्याला नरवाडी तांडा येथे नेले आणि तेथे त्याची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचेही समोर आले.

या गुन्ह्याचा उलगडा पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील आणि सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक गीते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या तपासात पोलिस पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

ताब्यात घेतलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघा आरोपींना ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर संबंधित अल्पवयीन गुन्हेगाराला परभणी येथील निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपास सोनपेठ पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT