परभणी येथे आंबेडकरी जनतेने सुरू केलेल्या आंदोलनास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी भेट दिली.  Pudhari Photo
परभणी

राज्यकर्त्यांनी सत्तेचा वापर शहाणपणाने करावा: परभणी, बीड घटनेवरुन शरद पवारांचा निशाणा

Sharad Pawar | अशा घटना महाराष्ट्रासाठी अशोभनीय

पुढारी वृत्तसेवा

परभणी, पुढारी वृत्तसेवा : परभणी व बीडमधील घटना या महाराष्ट्राला शोभणार्‍या नाहीत. राज्यकर्त्यांनी सत्तेचा वापर शहाणपणाने व समंजसपणाने करून या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी (दि.21) येथे पत्रकार परिषदेत केली.

बीड येथून हेलीकॉप्टरने दाखल झाल्यानंतर ज्येष्ठ नेते पवार यांनी मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंबेडकरी जनतेच्या सुरू असलेल्या धरणे आंदोलनास भेट दिली. आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर ते लोकनेते कै.विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. वाकोडे कुटुंबियांशी संवाद साधल्यानंतर खा.फौजिया खान यांच्या नांदखेडा रोडवरील निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ज्येष्ठ नेते पवार म्हणाले, परभणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरातील संविधानाच्या अवमान प्रकरणानंतर आंबेडकरी जनतेची उमटलेली प्रतिक्रिया साहजिकच होती. मात्र, त्यानंतरच्या घडलेल्या प्रकारांमध्ये ज्यांचा संबंध नाही. अशांना पकडून पोलिस खात्याने ज्या पद्धतीने त्यांना वागणूक दिली. त्यातूनच सोमनाथ सुर्यवंशीसारख्या युवकाचा मृत्यू झाला, असे नमुद करीत नामांतराच्या चळवळीत आमच्या बरोबरीने काम करणारे ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचा देखील मृत्यू झाल्याने लोकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात सध्या जे काही घडतंय ते शोभणारं नाही. आत्ताच याबाबत आपण काही करू शकत नसलो, तरी राज्य सरकारकडे हा विषय मांडू. राज्यकर्त्यांनी सत्तेचा वापर शहाणपणाने व समंजसपणाने करणे गरजेचे आहे. त्यातूनच त्यांना या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असेही पवार म्हणाले.

नुसते येऊन चालणार नाही, अ‍ॅक्शन गरजेची

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठोपाठ शनिवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल होत असल्याच्या प्रश्‍नावर पवार यांनी राज्य सरकारला या विषयाची दखल घेणे गरजेचे आहे. परंतू नुसते येऊन चालणार नाही. तर अ‍ॅक्शन घेतली पाहिजे, असा टोला लगावत सत्तेत सहभागी असलेल्या लोकांचा या प्रकारात सहभाग असल्याचा आरोप जनतेतून होत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली पाहिजे, असेही पवार म्हणाले.

पत्रकार परिषदेस खा.फौजिया खान, खा.बजरंग सोनवणे, खा.निलेश लंके, माजी मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. अ‍ॅड.विजय गव्हाणे, माजी आ.विजय भांबळे, पक्षाचे उपाध्यक्ष भीमराव हत्तीअंबीरे, जिल्हा सरचिटणीस रमाकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT