Shaktipeeth Highway: Farmers' power united
परभणी, पुढारी वृत्तसेवा : सहजपूर जवळा येथे शक्तीपीठाच्या जमीन मोजणी दरम्यान पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांवर केलेल्या अत्याचारामुळे संतापाचे वातावरण असून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी शक्ती एकवटली आहे. सोमवारी (दि. २३) शिंगणापूर फाटा येथे शिवसेनेच्या वतीने तर आंबेटाकळी कॉर्नर येथे शेतकरी व सर्व पक्ष संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासह मोजणी उधळून लावण्यासाठी रविवारी सावली विश्रामगृहावर बैठक पार पडली. बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे, अॅड. माधुरी क्षीरसागर, सतीश घाटगे व जिल्हाभरातील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
बैठकीत सोमवारी सकाळी आंबेटाकळी कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सहजपूर जवळा येथे पोलीस प्रशासनाने मोजणीला विरोध करणाऱ्या महिला व पुरुष शेतकऱ्यांना क्रूर वागणूक देत फरफटत नेल्यामुळे पोलीस प्रशासन, राज्य शासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. कुठल्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा नाही, या निर्धारावर शेतकरी ठाम असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्य शासन शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीचा घाट घालत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात महामार्गासाठी शेतीची मोजणी होणार होती. तिला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी लोकशाही मागनि आंदोलन करण्याचे जाहीर केले. प्रत्यक्ष मोजणी सुरू असताना परभणी तालुक्यातील सहजपूर जवळा व सोनपेठ तालुक्यातील कोठाळा शिवारात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र शक्तिपीठाच्या विरोधात लोकशाही मागनि आंदोलक शेतकऱ्यांना पोलीसांनी दडपशाही करत गुन्हे दाखल केले. तसेच महिलांवरही दडपशाही करून गुन्हे दाखल केले.
पोलीसांच्या या दडपशाहीचा निषेध व शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी सिंगणापूर फाटा येथे शिवसेना (उबाठा) च्या वतीने सकाळी ९ वाजता रास्ता रोको आंदोलन होईल. आंदोलनात सर्व संघटना, शिवसेनेचे पदाधिकारी व आजी-माजी लोकप्रतिनिधी सहभाग घेणार आहेत. न्यायासाठी झगडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार होत असताना आपण स्वस्थ बसून तो उघड्या डोळ्यांनी पाहू नये.
तर शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासह त्यांना अधिक बळ देण्यासाठी सर्व घटकांतील लोकांनी, शेतकरी, भगिनी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, गंगाप्रसाद आणेराव, परभणी बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांनी केले.
सिंगणापूर फाटा येथे खा. संजय जाधव यांच्या नेतृत्वात रास्ता रोको
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात लोकशाही मागनि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दडपशाही करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध व शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सोमवारी सिंगणापूर फाटा येथे सकाळी ९ वाजता खा. संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन होणार आहे.
परभणी, सोनपेठ तालुक्यांत आज मोजणी
सहजपूर जवळा येथे शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीसाठी आलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी सोनपेठ तालुक्यातील शिर्शी व कान्हेगाव येथे जमीन मोजणी होणार आहे. तर परभणी तालुक्यातील आंबेटाकळी व ताडपांगरी येथेही शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी केली जाणार आहे.