परभणी : राज्यातील शेतकर्यांना सरसकट २ लाखांची कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. रोहित पवार यांनी आज एल्गार आंदोलनासंदर्भात आयोजित बैठकीत केली. २९ जून रोजी कर्जमाफीसाठी संभाजीनगर येथे होणार्या एल्गार आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. अधिवेशनात शासनाने कर्जमाफीचा शब्द दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही आ. पवार यांनी दिला.
आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे, मा. खा. फौजिया खान, माजी आ. विजय गव्हाणे, माजी आ. व्यंकटराव कदम, संतोष बोबडे, ॲड. माधुरी क्षीरसागर, भीमराव हत्तीअंबीरे, कृषीभूषण कांतराव देशमुख व मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी याप्रसंगी पुढे बोलताना आ. पवार म्हणाले की, २०१९ ला महाविकास आघाडी सरकारने सरसकट २ लाखांची कर्जमाफी केली होती. त्यानंतर मागील ६ वर्षांत शेतकऱ्यांचा खर्च वाढत गेला. खताचे भाव वाढले. पेट्रोल-डिझेल महागले, परंतु सोयाबीन, कपासीला हमीभाव मिळाला नाही. यामुळे शेतकर्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.
महायुती सरकारने जूनमध्ये कर्जमाफी करू असे सांगितले. परंतु शासन परिपत्रकामुळे ७० टक्के शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसून त्यांच्यावर अन्याय होणार आहे. २०१९ मध्ये लाभ घेतलेल्या शेतकर्यांना केवळ ५० हजार रुपयांचा लाभ होणार आहे. ज्यांचे कर्ज २ लाखांच्या वर आहे, त्यांना उर्वरित रक्कम अगोदर भरावयाची आहे.
महायुती सरकारने सरसकट २ लाखांची कर्जमाफी द्यावी, असेही आ. रोहित पवार म्हणाले. मागे महायुती सरकारने ३५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना १८ हजार कोटी रुपयेच मिळाले. यामुळे उर्वरित कर्जमाफीची रक्कम कुठे गेली ? असा सवालही आ. पवार यांनी उपस्थित केला.
राज्यात कर्जमाफीसाठी आपल्यासह काही शेतकरी नेत्यांनी आंदोलन केल्यानंतर २२ जूनपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले होते. त्यासाठी बैठक बोलावू, असे आश्वासनही मंत्र्यांनी दिले होते. परंतु अद्याप कुठल्याही हालचाली झालेल्या नाहीत. अधिवेशना दरम्यान कर्जमाफीसंदर्भात कृषिमंत्री व सहकारमंत्र्यांनी थातूर-मातूर उत्तर दिल्याचेही आ. पवार म्हणाले.
२९ जूनला कर्जमाफीसाठी संभाजीनगर येथील केंब्रीज चौकात कर्जमाफीसाठी एल्गार पुकारण्यात येणार असून या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आ. पवार यांनी केले. जोपर्यंत कर्जमाफीचा शब्द दिला जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही आ. पवार यांनी दिला.