Road development is the key to all-round progress: MLA Gutte
गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : रस्ता म्हणजे केवळ डांबरी मार्ग नसून तो ग्रामीण विकासाची खरी जीवनवाहिनी आहे. रस्ते हे गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीचे मुख्य साधन आहेत, असे प्रतिपादन आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केले.
तालुक्यातील बडवणी आणि कातकरवाडी या गावांमध्ये प्रस्तावित ग्रामसडक योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांकडून काही अडचणी मांडण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आ. गुट्टे यांनी संबंधित गावांना प्रत्यक्ष भेट देत ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी सविस्तर संवाद साधला.
यावेळी गावकऱ्यांनी रस्ता कामाबाबत शंका व अडचणी मांडल्यावर आमदारांनी सर्वांच्या भावना समजून घेत त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. या कामामुळे कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असून ती जनहिताच्या दृष्टीनेच राबविली जाणार आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी चर्चे दरम्यान दिले. डॉ. गुट्टे पुढे म्हणाले, रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे सोपे होते, आजारी रुग्णांना वेळीच उपचार मिळतात, शेतीमाल वेळेवर बाजारात पोहचतो आणि गावात लघु उद्योगांना चालना मिळते.
ग्रामसडक व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे गावागावात विकासाचे नवे दालन खुले होत आहे. रस्ता विकासकामात अडथळा येऊ नये म्हणून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन आ. गुट्टे यांनी केले. या संवादासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी, रासपचे पदाधिकारी, गुट्टे काका मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तहसीलदार उषाकिरण शृंगारे उपस्थित होत्या.