पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर पाणीपुरवठा सुरू झाला.  Pudhari Photo
परभणी

पूर्णा शहरवासीयांना दिलासा; अखेर पाणीपुरवठा सुरळीत सुरू

Parbhani News | जॅक्वेल मोटारपंप फिटिंगचे काम करण्यात यश

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर पूर्णा नदीवरून होणारा पाणीपुरवठा आज (दि. २१) सायंकाळी सुरळीत सुरू झाला. त्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला. पाणी उपसा करणारी ७५ अश्वशक्तीची विद्युतमोटार व जॅक्वेल-फुटबॉल अचानक नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठा खंडित झाला होता. मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे आणि पाणीपुरवठा अभियंता किरण गुट्टे यांच्या सुचनेनुसार तत्काळ दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.

जळालेली मोटारपंप व फुटबॉल तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील एका वर्कशॉपमध्ये दुरुस्तीकरीता नेले होते. जुन्या पध्दतीचा फुटबॉल असल्यामुळे दुरुस्तीसाठी विलंब लागला. वर्कशॉपमधील मेकॅनिक टीमला तांत्रिक दुरूस्ती आणि जॅक्वेल मोटारपंप फिटिंगचे काम करण्यात यश आले. ट्रायल घेतल्यानंतर सायंकाळी पाणीपुरवठा सुरळीत चालू करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता किरण गुट्टे यांनी 'दै पुढारी'शी सांगितले.

दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांसह महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. काही ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू केला होता. भाजप महिला मोर्चा अघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह जनता आक्रमक झाली होती. पालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात जन आंदोलन छेडण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते प्रताप कदम यांनी नगरपालिका कार्यालयाला कुलूप ठोकले होते. 'दै पुढारी'तील वृत्ताची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. अखेर आज पाणीपुरवठा सुरू झाल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT