मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी शहरातील कल्याणनगर येथील गोविंद निवास येथे दिवंगत खासदार रामराव वडकुते यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.  pudhari photo
परभणी

MP Ramrao Wadkute Death : जनतेशी नाळ जोडणारे नेतृत्‍व हरपले

मुख्यमंत्र्यांकडून खा. वडकुते यांच्‍या पार्थिवाचे अंत्‍यदर्शन ; कुटुंबीयांचे सांत्‍वन

पुढारी वृत्तसेवा

परभणी: जनसामान्यांशी घट्ट नाळ जोडून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे आणि लोकाभिमुख कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे खासदार रामराव वडकुते यांच्या निधनाने मराठवाड्यासह संपूर्ण धनगर समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, कर्तृत्ववान आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले प्रभावी नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.२३) परभणी शहरातील कल्याणनगर येथील गोविंद निवास येथे दिवंगत खासदार रामराव वडकुते यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी वडकुते यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचा विश्वास देत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला.

वडकुते यांच्या कार्याचा आवाका केवळ राजकीय क्षेत्रापुरता मर्यादित नव्हता, तर समाजातील सर्वसामान्य माणसाशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध हीच त्यांची खरी ताकद होती. त्यांच्या अचानक जाण्याने मराठवाड्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विशेषतः धनगर समाजासाठी ही घटना अत्यंत वेदनादायी असून, त्यांच्या कार्याची आणि योगदानाची समाजाला कायम आठवण राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी ऊर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोक चव्हाण, खा.संजय जाधव, आ. रत्नाकर गुट्टे, आ. गोपीचंद पडळकर, आ. बालाजी कल्याणकर, आ.अमरनाथ राजूरकर, परभणीचे महापौर सय्यद इकबाल, जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, माजी आ. सुरेश वरपुडकर, भाजपा जिल्‍हाध्यक्ष सुरेश भुमरे, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले आदी उपस्थित होते.

आज हिंगोलीत शासकीय इतमामात अंत्‍यसंस्‍कार

खा. रामराव वडकुते यांचे रविवारी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात हृदयविकाराने वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त करण्यात आला. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता हिंगोली येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या निधनाने धनगर समाजाचा बुलंद आवाज आणि जनतेच्या प्रश्नांसाठी धडपडणारे नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

परभणी जिल्‍ह्याची हानी

खा. रामराव वडकुते यांच्या निधनाने परभणी व हिंगोली जिल्ह्याची मोठे हानी झाली आहे. राजकारणात वावरत असताना समाजकारणात त्यांचे मोलाचे योगदान होते. बीएसस्सी ऑनर्स असलेल्‍या खा. वडकुते यांनी आपल्या सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात स्व. शिवाजीराव शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली केली होती. परभणी व हिंगोली जिल्हासह सबंध राज्यभरही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमठवला होता. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खा. वडकुते यांच्या पत्नी इंदुमती, मुले दिलीप, शशिकांत, मुलगी विजयमाला, जावई दिनेश बदने, बंधू डॉ. प्रल्हाद वडकुते, विठ्ठल वडकुते यांचे सांत्वन करत खा. वडकुते यांचे कार्य पुढे न्यायचे असून येणाऱ्या काळात स्वतःला सावरून बाहेर पडा असे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT