रामेश्वर मंदिर वझूर येथे दर्शनासाठी आलेले मलेशियन दाम्पत्‍य अँडी आणि कोय  Pudhari Photo
परभणी

Rameshwara Temple Parbhani |मलेशियातील पर्यटक दांपत्य आले वझूर ग्रामदैवत रामेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी

वझूरला जागतिक ओळख मिळण्यास बळ, सोशल मिडीयातून पुरातन मंदिराची ख्याती पोहचत आहे परदेशातही

पुढारी वृत्तसेवा

परभणी : पेनांग, मलेशिया येथील पर्यटक दांपत्य अँडी आणि कोय यांनी दि.३ डिसेंबर रोजी रात्री ८.१५ वाजता वझूर (ता.पूर्णा) ग्रामदैवत श्री रामेश्वर महादेव मंदिराला भेट देत प्राचीन शिल्पकलेचे दर्शन घेतले. या भेटीमुळे वझूरच्या सांस्कृतिक वारशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्याचा मार्ग अधिक मजबूत झाला आहे.

वझूर येथील रामेश्वर मंदिरातील लाईव्ह आरती, मंदिराचा इतिहास, मंदिर परिसरातील उपक्रम यांची माहिती समाज माध्यमांतून देश-विदेशात पोहोचत आहे. याच पार्श्वभूमीवर वझूर गावातील गणेश कारंडे यांनी मंदिराची लाईव्ह आरतीची लिंक व मंदिराचे माहितीपत्रक पुण्यातील हर्षल बर्डे यांना पाठवले. त्यांनी हा व्हिडिओ मलेशियातील पर्यटकांना दाखवला. मंदिराची शोभा आणि शांत वातावरण पाहून दांपत्याला प्रत्यक्ष दर्शनाची उत्सुकता निर्माण झाली आणि त्यांनी तातडीने भारत भ्रमंती दरम्यान वझूर गावाला भेट देण्याचा निर्णय घेतला.

वझूर येथे आगमनानंतर प्रल्हाद पवार (ऐतिहासिक वारसा अभ्यास गट) यांनी अँडी आणि कोय दांपत्याला वझूरची प्राचीन परंपरा, मंदिरातील दगडी शिल्पकला, स्थापत्य वैशिष्ट्ये, तसेच गावाच्या सांस्कृतिक इतिहासाची माहिती दिली. दर्शनानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पर्यटक दांपत्याने, श्री रामेश्वर मंदिर अत्यंत शांत, सुंदर आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारे आहे. पुढील भारतभेटीत आमच्या आणखी सहकाऱ्यांसह येथे पुन्हा येऊ, असे सांगितले. गावातील ग्रामस्थांनी या पर्यटकांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. परदेशातून आलेल्या पाहुण्यांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त समाधानामुळे गावकऱ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भेटीमुळे वझूर गावाला नवीन ओळख मिळण्यास मदत होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

पर्यटन विकासासाठी नवी दिशा

वझूरसह पूर्णा परिसरात परदेशी पर्यटकांचा ओघ वाढत असल्याचे निरीक्षण स्थानिक पातळीवर घेतले जात आहे. यानिमित्ताने गावात सुविधा विकसित करण्याची आवश्यकता प्रकर्षाने समोर येत आहे. यात गावातील स्वच्छता व परिसर सौंदर्यीकरण, रस्ते, पार्किंग व मूलभूत भौतिक सुविधा, एक दिवस, तीन दिवस व आठ दिवसांच्या पर्यटन पॅकेजेस, पर्यटकांसाठी गाईड सेवा, माहिती केंद्र व निवास सुविधा करिता आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. रामेश्वर मंदिर, वझूरची प्राचीनता आणि परिसरातील सांस्कृतिक वारसा यामुळे या भागात पर्यटनाच्या नव्या संधी निर्माण होत असून येत्या काळात वझूरचे नाव पर्यटन नकाशावर ठळकपणे उमटेल, असा आशावाद ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT