

ऐतिहासिक श्री क्षेत्र रामेश्वरचा महाशिवरात्री उत्सव सोहळा बुधवार,26 फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. गिर्ये, रामेश्वर व विजयदुर्ग या तीन गावांची ही ग्रामदेवता आहे. गावातील नोकरी व्यवसायानिमीत्त बाहेरगावी असलेल्या ग्रामवासीयांना श्री देव रामेश्वर दर्शनाची महाशिवरात्री उत्सवाच्या औचित्यावर उत्कंठा लागते. ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला, अथांग अरबी समुद्र, निसर्गरम्य वातावरण अशा अद्भूत ठिकाणी स्थापित श्री रामेश्वर मंदिरात येणारे भक्तगण येथील निर्मळ व पवित्र वातावरणात मंत्रमुग्ध होतात. विज्ञान व अध्यात्माचा अनोखा ठेवा, श्री स्वयंभू-रामेश्वर पिंडीचा इतिहास व त्याचप्रमाणे कुठूनही मनोभावे प्रार्थना केल्यावर नवसाला पावणारा, संकटनिवारण करणारा देव म्हणून श्री रामेश्वरचा लौकिक आहे.
श्री देव रामेश्वर हे पंचक्रोशीतील पवित्र व जागृत देवस्थान असून, या महाशिवरात्रोत्सवास सिंधुदुर्गसह पुणे, मुंबई, बेळगाव, कोल्हापूर, रत्नागिरी आदींसह महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून भाविक या उत्सवास येतात. श्री देव रामेश्वरच्या आवारात विशेषतः सभा मंडपात आपण येतो, तेव्हा वेगळ्या अद्भुत शक्तीचा प्रभाव आपल्याला जाणवतो. ही अद्भुत उर्जा विचारातून कृतीत सकारात्मक दृष्टीने घेतल्यास आपण जीवनात कोणत्याही संकटावर मात करू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण होतो. मन पवित्र व प्रसन्न होते. मंदिराचा जीर्णोद्धार करताना दुर्मीळ व पवित्र भावनेस बाधा येणार नाही याची योग्य काळजी घेण्यात आली आहे.
श्री देव रामेश्वर मंदिरास ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मूळ मंदिराची स्थापना इसवी सन 12 व्या शतकात झाली असावी. कारण जीर्णोद्धाराचे काम करत असताना मंदिराच्या बांधकामाची रचना विजयदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाप्रमाणे असल्याचे दिसून आले. या मंदिराचा विकास व विस्तार तीन वेळा केला असल्याचे जाणकार सांगतात. 17 व्या शतकाच्या पूर्वार्धात सरखेल कान्होजी आंग्रे. सरदार संभाजी व सखोजी आंग्रे, सरदार आनंदराव धुळप, श्रीमंत माधवराव पेशवे यांनी नेमलेले विजयदुर्ग प्रांतातील मुलखी सुभेदार गंगाधरपंत भानू अशा महान व्यक्तींकडून मंदिर व परिसराचा जीर्णोद्धार टप्प्याटप्प्याने झालेला आहे. ऐतिहासिक व पौराणिक असलेले देव रामेश्वर मंदिर केवळ कोकणी व पेशवाई वास्तुशैलीचा मिलाप दर्शवणारा वास्तु आविष्कार नव्हे तर अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. म्हणूनच तर या वैभवाचे पर्यटक व भाविकांना विशेष आकर्षण आहे.
श्री देव रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार वास्तू विशारद डॉ. अविनाशा सोहनी यांच्या अमुल्य मार्गदर्शनानुसार करण्यात आला. एखाद्या वास्तूचा जीर्णोद्धार करणे म्हणजे ती पूर्णता पाडून नव्याने बांधणे असा स्वाभाविक समज असतो. या गैरसमजामुळे आज मितीस मंदिरांच्या असंख्य जुन्या वास्तू नष्ट होऊन त्याची जागा नव्याने सिमेंट काँक्रिटने बांधलेल्या मंदिरानी घेतली आहे. मात्र, ज्या वास्तुला पूर्वापिठीचा वास्तू वारसा असतो. अशा श्री देव रामेश्वर सारखी 300 वर्षांचा वास्तू वारसा जपणारी, कोकणी व पेशवाई वास्तुशैलीचा सुंदर मिलाप दर्शविणारी मोजकीच वास्तु शिल्पे मुळ स्वरूपात टिकून आहेत. या वास्तू अनमोल ऐतिहासिक वारसा दर्शवितात. तसेच त्याने जतन मुल्य ही विशेष महत्वाचे मानले जाते. श्री रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार श्री देव रामेश्वर विश्वस्त मंडळ व श्री देव रामेश्वर जीर्णोद्धार समिती यांनी पारंपरिक पद्धतीने केले जाणारे वास्तुचे जतन व संवर्धन या तत्वाशी निगडीत राहून केल्याचे दिसुन येईल. मूळ वास्तुशैली व वास्तुस्वरूप न बदलता आवश्यक तिथे सुधारणा व दुरूस्त्या करण्यात आल्या आहेत.
जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले त्या सुमारास 25 मार्च 2009 रोजी देव रामेश्वराची नंदिवर आरूढ चर्तुभुज चांदीची मूर्ती चोरीस गेली. रामेश्वर, विजयदुर्ग, गिर्ये, गांवाबरोबर आजूबाजूचा परीसर त्यामुळे हादरून गेला. तपास कार्य सुरू झाले; पण दुर्दैवाने ती वैभवशाली मूर्ती काही सापडली नाही. त्यानंतरचे उत्सव व्यथित मनाने साजरे झाले. एका बाजूने मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना गिर्ये, रामेश्वर व विजयदुर्ग या तीन गावांचे ग्रामदैवत असलेल्या ईश्वराची मूर्ती ग्रामस्थांनी पदरमोड करून लोकश्रयातून व शिवभक्तांच्या सहकारातून पुन्हा निर्माण करण्याचा संकल्प केला व तो श्री देव रामेश्वरच्या कृपेने तडीसही नेला. श्री देव रामेश्वर नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव सोहळा 20 ते 23 मेपर्यंत अतिशय उत्साहात, दिव्य व भव्य स्वरूपात झाला. त्याचा हजारो भाविकांनी सहभाग घेऊन लाभ घेतला आहे. नूतन मूर्ती घडविण्याच्या कार्यात मंडळाचे विश्वस्त, जीर्णोद्धार समिती पदाधिकारी व उत्सव समिती सदस्य, निधी संकलन समिती सदस्य, सर्व पुजारी मंडळी, मानकरी व तीनही गावचे ग्रामस्थ व बंधू-भगिनी अनेक कारागिर, कर्मचारी बँक, विद्युत मंडळ, पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांनी अमूल्य देणगी देवून सहकार्य केले असे असंख्य भाविकांचे सहकार्य लाभले आहे. त्या सर्वाचे आम्ही ऋणी आहोत.
मंदिराच्या बाह्य भिंतीवरील चितारलेली चित्रे हा एक ऐतिहासिक अमूल्य ठेवा असून सदर काम सुरू करण्यात आले आहे. चुन्याचा प्लास्टर/गिलावा करून घेणे, मोल्डींग पट्टी दुरूस्ती करणे, दस्तऐवजीकरण करून घेणे, चित्राचे स्वरूप, मोजमाप, रंगसंगती निरिक्षणे, कथा व त्यातील पात्रे, चित्रकलेतील पद्धती याचा अभ्यास करणे, चित्राचे छाप त्यांचे स्कॅन करून डिजिटल दस्तऐवज बनविणे, गहाळ चित्रांचा शोध घेवून त्यातील व्यक्तीरेखा त्यांचे स्वरूप यांचा अभ्यास करून जुन्या ग्रथांतील अथवा चित्रांच्या माध्यमातुन संदर्भ घेवून तसेच चित्रांसाठी नैसर्गिक रंगद्रव्य वापरून चित्रे रेखाटन पूर्ण करण्यात येणार आहे. चित्रांचे रंगकाम पूर्ण झाल्यानंतर त्यावर संवर्धन करण्याच्या हेतूने रासायनिक प्रक्रिया करण्यात येईल. शेवटी काम पूर्ण झाल्यावर दस्तऐवज केले जाईल व अहवाल तयार करण्यात येईल. त्याचप्रमाणे मंदिर प्रांगणात असलेल्या कोटीचे (इमारतीचे) कामही पूर्ण झाले आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील सुशोभित व गार्डन इत्यादी कामे करण्यात येणार आहेत.
मंदिर प्रांगण सभोवतालची चिरेबंदी, तटबंदी घाटीचे बांधकाम इत्यादी आवश्यक कामे मंदिराचे विश्वस्त मंडळ योग्य तो निर्णय घेऊन हाताळणार आहेत. श्री देव रामेश्वरचा जीर्णोद्धार व विकासकामे यकरिता वेळोवेळी शिवभक्तांनी अमूल्य असे आर्थिक सहकार्य केले आहे. यापुढेही असे सहकार्य मिळेल याची खात्री आहे.