पूर्णा : तालुक्यात मागील पावणेदोन महिन्यांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीपावर संकट कोसळले. पावसाचा थेंब नसताना कडक उन्हाचा तडाखा सुरूच असल्याने शेतातील सोयाबीनची पिके अक्षरशः करपून वाळून गेली. डोळ्यांदेखत उभी पिके जळून जात असल्याने शेतकर्यांच्या आशा मावळल्या असून, त्यांच्या चेहर्यावर चिंतेचे सावट दाटले आहे.
गतवर्षी अतिवृष्टीने खरीपाचे मोठे नुकसान झाले होते. यंदा मात्र पावसाने पाठ फिरवल्याने कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे सलग दोन खरीप हंगाम नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले. कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा दीर्घ खंड या संकटांच्या फेर्यात शेतकरी भरडला जात आहे. गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सण सुरू असताना शेतकर्यांच्या हातात मात्र पैसा नसल्याने सणाचा आनंदही फिका पडला.
दरवर्षी खरीपातील मूग, सोयाबीन आदी पिकांच्या उत्पन्नातून शेतकरी सणासुदीचा किराणा बाजार करतात. यंदा पावसाअभावी मूग पीकही अपेक्षेप्रमाणे हाती आले नाही. सोयाबीनचे पीकही करपून गेल्याने उत्पन्नाचा आधारच संपला. महालक्ष्मी सणानिमित्त घरात विविध गोडधोड, तिखट-तळीव पदार्थ करण्याची परंपरा आहे. मात्र यंदा किराणा बाजारासाठीही पैसे नसल्याने अनेक शेतकरी कुटुंबांसमोर मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली.
सणाच्या काळात घरात आनंदाचे वातावरण असण्याऐवजी पैशांची जुळवाजुळव करण्याची चिंता शेतकर्यांना सतावत आहे. पावसाअभावी सोयाबीनचे उत्पादनच हातात येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने आडतेही सोयाबीनच्या भरवशावर उचल देण्यास तयार नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, शेतीचे उत्पन्न अनिश्चित झाल्याने खासगी सावकारांकडूनही उसनवारी अथवा व्याजाने पैसे मिळणे कठीण झाले.
शेतातील पीकच उत्पन्न देणार नसेल तर कर्जाची परतफेड कशी करायची, यामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात आणखी अडकण्याची भीती आहे. शेतीशिवाय अन्य कोणताही जोडधंदा नसलेल्या कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली. यंदा कोरड्या दुष्काळाचे संकट उभे राहिले असतानाच खरीप हंगाम 2025 मधील पीकविमा नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याची शेतकर्यांची तक्रार आहे.
मागील हंगामातील भरपाईची प्रतीक्षा असतानाच यंदाच्या हंगामातील पिकेही वाया जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकर्यांची आर्थिक कोंडी वाढली. पीकविमा भरपाई तातडीने मिळावी, यासाठी संबंधित यंत्रणेने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांचे पंचनामे करावेत, कोरडा दुष्काळ जाहीरबाबत तातडीने निर्णय घ्यावा, पीकविमा भरपाई अदा करावी तसेच पिण्याचे पाणी व जनावरांच्या चार्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
पाणीपातळी खालावली; चार्यांचे संकट
पावसाचा दीर्घ खंड पडल्याने विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. जनावरांसाठी चार्याची उपलब्धताही कमी होऊ लागल्याने पशुपालक शेतकर्यांची चिंता वाढली. पिके वाळून गेल्याने शेतातील हिरवा चारा उपलब्ध होण्याची शक्यता कमी झाली. त्यामुळे पुढील काळात जनावरांच्या वैरणीचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.