पूर्णा : येथील पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी (दि.१९) शहरात अवैध धंद्यांविरोधात मोठी धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रेशन धान्याचा मोठा साठा जप्त केला. एका दिवसात केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांत २१ लाख ५० हजारांचा प्रतिबंधित गोवा गुटखा व स्कॉर्पिओ वाहन, तसेच ४० गोण्या गहू आणि ५९ गोण्या तांदूळ अशा एकूण ९९ गोण्या रेशन धान्याचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे शहरासह परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस प्रशासन पथकाला गजानन महाराज मंदिर परिसरातील एका गोदामात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य विनापरवाना साठवून ठेवून त्याची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने तातडीने छापा टाकला.
यात ४० गोण्या गहू आणि ५९ गोण्या तांदूळ, असा एकूण ९९ गोण्यांचा साठा आढळून आला. या धान्याचा पंचनामा करून संपूर्ण साठा जप्त केला असून, संबंधित व्यक्तींविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई केली. याच दिवशी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या पथकाला आणखी एक महत्त्वाची गोपनीय माहिती मिळाली. नांदेडकडून पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गोवा गुटखा शहरात विक्रीसाठी आणला जात असल्याचे समजताच पथकाने राजमुद्रा चौक परिसरात सापळा रचला.
काही वेळातच संशयित स्कॉर्पिओ दिसताच पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन भरधाव वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पथकाने पाठलाग केला, काही अंतरावर चालकाने वाहन रस्त्यावर सोडून अंधाराचा फायदा घेत पलायनकेले. नंतर पोलिसांनी पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवा गुटख्याच्या ४० बॅगा आढळल्या. या गुटख्याची किंमत ७लाख ५० हजार रुपये, तर जप्त स्कॉर्पिओची किंमत १४ लाख असा एकूण २१ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
फरार चालक व संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली फौजदार चंदनसिंह परिहार, अर्जुन टर्के, पोह यशवंत वाघमारे, गोविंद चुडावकर, सूर्यकांत ताटीकोंडलवार, रंगनाथ दुधाटे, महेश कवठाळे, सचिन भदर्गे, दीपक मुदीराज, सूर्यकांत सातपुते, गजानन क्षीरसागर, लिंबाजी वाव्हळे, हनुमान ढगे आर्दीच्या पथकाने केली. शहरात काही दिवसांपासून प्रतिबंधित गुटखा विक्री आणि रेशन धान्याच्या काळाबाजाराबाबत तक्रारी वाढत होत्या.
गुन्हे शाखेच्या सलग कारवायांमुळे अवैध धंद्यांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.