आनंद ढोणे
पूर्णा: तालूका परिसरात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर गोवंशिय जनावरांना लंपी स्किन डीसीज (एल एस डी) आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. यात, गाय, कालवड, बैल ह्या पशूधनास ताप चढणे, अंगभर गाठी येत आहेत. हा लंपी स्किन डीसीज विषाणूयुक्त संसर्गजन्य आजार असल्यामुळे तो लंपी बाधीत जनावरांच्या संपर्कात येवून इतरही निरोगी जनावरांना झपाट्याने लागण होत आहे. सदर आजार सध्या पूर्णा तालूक्यातील भागात मोठ्या प्रमाणावर सुरु झाला आहे. यात, जनावरे आजारी पडल्यामुळे शेतकरी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्यात परेशान दिसून येत आहेत.
उपचार करुनही आजार लवकर बरा होत नसून अनेक दिवस अंगावर गाठी कायम राहत आहेत. हा रोग अतिशय चिवट असून दिर्घकाळ उपचार चालू ठेवावे लागत आहे. तरी देखील अजाराची तिव्रता कमी होत नाही. लसीकरण करुन देखील अजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. लंपीवर अजून कायमस्वरुपी उपचार उपाययोजना नसल्यामुळे हा आजार लवकर आटोक्यात येत नाही.
गोट फॉक्स लसीकरण प्रभावी ठरताना दिसत नाही. निरोगी जनावरास ही लस दिल्यास एकवीस दिवस आजाराचा प्रादुर्भाव होत नाही असे सांगितले जाते. मात्र ही लस देवूनही अजाराचा प्रादुर्भाव होत आहे. आता पर्यंत शेकडो जनावरांना लंपीची लागण झाली आहे. शेतकरी उपचार करुन हैराण होत आहेत. तरी देखील अजार दुरुस्त होत नाही. अनेक ठिकाणी जनावरे दगावत आहेत. परिणामी, पशूपालक शेतकरी जनावरे पाळणे सोडून देण्याच्या मार्गावर आहेत. दुभती जनावरे मृत्युमुखी पडत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.
गौर येथे चार जनावरे मृत्युमुखी
लंपी स्किन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यसाठी केलेले लसीकरण कुचकामी ठरल्यामुळे चार पशूधने लंपीमुळे मृत्युमुखी पडली आहेत. उपचार करुनही रोग आटोक्यात आला नाही यात, बबन किशन जोगदंड यांचा एक बैल तसेच सोमनाथ जोगदंड, केशव कदम, अर्जून सोनटक्के या शेतकऱ्यांचे पशूधने दगावली.अजून अनेक जनावरे लंपीबाधीत झाली आहेत.
गोवंशिय पशूधन जनावरावरील लंपी स्किन डीसीज हा आजार माशा व डासांच्या चाव्यामुळे होत असून तो विषाणूयुक्त संसर्गजन्य आहे. तो होवू नये यासाठी जिथे जनावरे बांधली जातात तो परिसर गोठा स्वच्छ ठेवावा. माशा व डासांचा फैलाव रोखण्यासाठी गोठ्यात कडू लिंबाच्या पाल्याचा वेळोवेळी धुर करावा. लंपी बाधीत जनावरांचे त्वरित उपचार करुन घ्यावीत.बाधीत जनावरे निरोगी पशूपासून दुर ठेवावे.त्यांचे चारापाणी केल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावेत.गोठ्यात निर्जंतुकीकरण फवारणी करावी. आजार जडल्यास त्वरित पशूधन विकास डॉक्टरांना संपर्क साधावा.डॉ. आर. डी. कसबे , पशूधन विकास अधिकारी चुडावा.