Purna borewell scam allegation pudhari photo
परभणी

Purna borewell scam allegation : बोअरवेल्‍स न करताच १० लाखांचा निधी लाटल्‍याचा आरोप

पूर्णेतील प्रभाग ९ मधील प्रकार; महिला नगरसेविकेची जिल्‍हाधिकार्‍यांकडे तक्रार

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा : नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये नवीन बोअरवेल्स व सबमर्सिबल विद्युत मोटारपंप बसविण्यासाठी मंजूर केलेल्या सुमारे 10 लाखांच्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या नगरसेविका पद्मिनबाई एंगडे यांनी केला. प्रत्यक्षात एकही बोअरवेल न करता कागदोपत्री कामे दाखवून संबंधित कंत्राटदाराची बिले अदा करण्यात आल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. या तक्रारीमुळे नगर पालिकेच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रभाग 9 मध्ये अल्पसंख्याक योजनेंतर्गत नवीन बोअरवेल्स व सबमर्सिबल विद्युत मोटार पंप बसविण्यासाठी सुमारे 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, संबंधित कंत्राटदाराने या प्रभागात एकही बोअरवेल न करता काम पूर्ण झाल्याचे दाखवून बिले सादर केली. पालिका प्रशासनानेही ही बिले अदा केल्याचा आरोप नगरसेविका एंगडे यांनी केला आहे.

हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संबंधित पाणीपुरवठा अभियंता राजेश जाधव यांना याबाबत माहिती देण्यात आली. मात्र, तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला. या संपूर्ण प्रकारामागे संबंधित अधिकारी व कंत्राटदाराची संगनमताची भूमिका आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. शहरात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत पाणीपुरवठ्यासाठी मंजूर होणार्‍या निधीचा योग्य वापर होणे आवश्यक असताना प्रत्यक्ष कामे न करताच निधी खर्च झाल्याचे दाखविले जात असेल, तर हा प्रकार गंभीर असल्याचे नगरसेविका एंगडे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने चौकशी करून संबंधित पालिका अधिकारी, अभियंता व कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित करावी. दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

एकीकडे महिला नगरसेविकेने दहा लाखांच्या निधीच्या गैरव्यवहाराचा आरोप केला असून, दुसरीकडे नगर पालिका प्रशासनाने आरोप फेटाळून कामे झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी व कागदपत्रांची तपासणी करून चौकशी झाल्यासच सत्य समोर येणार आहे. जिल्हाधिकारी प्रशासन या तक्रारीवर काय कारवाई करते, याकडे पूर्णेकरांचे लक्ष लागले आहे.

प्रशासन म्‍हणते, कामे झाली

दरम्यान, नगरसेविका एंगडे यांनी केलेल्या आरोपांबाबत नगर पालिका प्रशासनातील एका जबाबदार अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, बोअरवेल्स व सबमर्सिबल विद्युत मोटार पंपाची कामे प्रत्यक्षात झालेली आहेत. त्यामुळे कामे न करताच बिले उचलल्याचा आरोप चुकीचा असून, झालेल्या कामाची बिले अदा करावीच लागतात, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT