

नांदेड : ओळख लपवायची, नाव बदलायचे आणि पकडले जाण्याची भीती वाटली की थेट जिल्हा सोडून पसार व्हायचे... गेल्या १५ वर्षांपासून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या एका अट्टल घरफोड्याला अखेर नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जेरबंद केले. तब्बल सात जणांची टोळी जमवून घरफोड्या करणारा झुंबर चंदर काळे (वय ६५, रा. सावळेश्वर, ता. केज, जि. बीड) हा सराईत गुन्हेगार बीड जिल्ह्यातील केज येथून पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
नांदेड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या नेतृत्वाखाली जुन्या व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद खैरे व त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून एक ठोस बातमी मिळाली. २०११ मध्ये तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत (गु.र.नं. १८/२०११) घडलेल्या मोठ्या घरफोडीतील फरारी आरोपी झुंबर काळे हा बीडच्या केज तालुक्यातील सावळेश्वर परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता केजकडे धाव घेतली. आरोग्य केंद्र परिसरात छापा टाकून एका संशयिताला ताब्यात घेतले. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या या इसमाला पोलिसी हिसका दाखवून विश्वासात घेताच त्याने हदगाव व तामसा परिसरात २०११ मध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली.
तपासात उघड झाले की, झुंबर हा एकटा नसून त्याची सात जणांची संघटित टोळी होती. गुन्हा घडल्यानंतर स्वतःची ओळख लपवून वेगवेगळ्या जिल्ह्यांत ठिकाणे बदलत तो राहत होता. त्याच्या अटकेमुळे तामसा ठाण्यातील १५ वर्षांचा जुना गुन्हा तर उघडकीस आलाच आहे, पण त्याच्या टोळीतील इतर सदस्यांचा आणि त्यांनी केलेल्या अनेक जुन्या घरफोड्यांचा उलगडा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
आरोपी झुंबर काळे हा ७ जणांच्या टोळीचा मुख्य भाग होता. १५ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा हा आरोपी हाती लागल्यामुळे आता त्याच्या उर्वरित ६ साथीदारांचा शोध सुरू झाला असून, नांदेड व लगतच्या जिल्ह्यांतील घरफोडीचे अनेक अप्रकाशित गुन्हे उघडकीस येतील.
यांनी केली कामगिरी..
पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व सुरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि गोविंद खैरे, अंमलदार कालरा, ब्रह्मानंद लामतुरे व राजकुमार डोंगरे यांच्या पथकाने बीडमध्ये जाऊन ही धाडसी कारवाई केली.