पूर्णा : शहरातील नवा मोंढा येथील मार्केट कमिटी आवारातील एका आडत दुकानाचे शटर कुलूप तोडून चोरट्यांनी आतील १३ पोते (१ लाख रुपये किंमतीची) हळद कांडी चोरुन नेल्याची घटना ७ जुलै सोमवार रोजी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे चोरट्यांनी मार्केट कमिटीचे संचालक डॉ. जयप्रकाश मोदाणी यांच्याच आडतीला लक्ष करुन चोरी केली आहे. दरम्यान आडतमालक मोदाणी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध पूर्णा पोलिस ठाण्यात ७ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती असी की, पूर्णा शहरातील मार्केट कमिटी यार्डात मार्केटचे संचालक डॉ जयप्रकाश मोदाणी, शिवप्रसाद मोदाणी या भावांडाची पवन ट्रेडिंग कंपनी नावाने आडत दुकान आहे. सदर आडत ते ५ जुलै शनिवार रोजी सायंकाळी आडत दुकान बंद करुन घरी गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आडत दुकान मोंढा दर आठवड्याला म्हणजे रविवारी बंद असतो त्यामुळे त्यांची आडत ६ जुलै रोजी बंदच होती.
७ जुलै सोमवार रोजी सकाळी आडत दुकान उघडण्यासाठी मुनीम गेले असता त्यांना दुकानाचे शटर वाकवून कुलूप तोडल्याचे निर्दशनास आले.हा प्रकार त्यांनी मालक मोदाणी यांनी सांगितला.ते तातडीने आडत दुकानावर येवून त्यांनी दुकान पाहीले असता १३ हळद कांडी पोते चोरुन नेल्याचे दिसून आले.त्यावरुन त्यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात शटर कुलूप तोडून एक लाख रुपये किंमतीचे हळद पोते चोरी झाल्याची तक्रार दाखल केली.
दरम्यान,सदर चोरीची घटना मार्केट यार्डातील दुकानासमोरील सिसीटीव्ही कॅमेरा मध्य टिपली असल्याचे सांगण्यात येत आहे.आडत मालक शिवप्रसाद मोदाणी यांच्या फिर्यादीनुसार चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोनि विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करत आहेत.