

पूर्णा : तालुक्यातील धनगर टाकळी लगत असलेल्या गोदावरी नदीपात्रातून अवैध मार्गाने रेतीउपसा करणारा तरफा इंजिन साहित्य विशेष पोलिस महानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड शहाजी उमप यांच्या ४ नंबर पथकाने सापळा रचून छापेमारी केली. या घटनेत पोलिसांनी सुमारे एक लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करुन एक जना विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ही कार्यवाही शनिवार ता.५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालूक्यातील धनगर टाकळी शिवारात गोदावरी नदीपात्रात विनापरवाना अवैधरित्या डिझेल इंजिनच्या सहाय्याने तराफे नदीपात्रात सोडून रेती उत्खनन सुरु होते. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांनी अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी विशेष पथकाच्या सहाय्याने छापेमारी चालू केली आहे.
सदरील पोलिस पथकाने शनिवारी दुपारच्या सुमारास गोदापात्रात धडक घेत अवैध वाळू उपसा विरोधात कार्यवाही केली आहे. यावेळी विशेष पथक क्रमांक ४ मधील फौजदार श्रीमती शकुंतला डुकरे, गौतम ससाणे, खत्री यांनी चुडावा स्थानकाचे फौजदार अरुण मुखेडकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांना सोबतीला घेऊन ही कार्यवाही केली आहे.
या प्रसंगी पोलिसांनी एक इंजिन, तराफे असा सुमारे एक लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करत प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शकुंतला डुकरे यांच्या फिर्यादीवरून चुडावा पोलिस ठाण्यात अवैध वाळू उपसा तसेच वाळू चोरी सह गौण खनिज कलम कायद्यानुसार धनगर टाकळी येथील ईसम नामे ज्ञानेश्वर रौंदळे यांचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सहायक पोलीस सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनात अरुण मुखेडकर करत आहे. विशेष पोलिस पथकाच्या कार्यवाही नंतर वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.