Jintur Yeldari Road pothole Issues
जिंतूर : जिंतूर - यलदरी मार्गावरील दिवसेंदिवस वाढणाऱ्या खड्यांमुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी दिवाळी पाडव्यानिमित्त या रस्त्यावर अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. जागोजागी पडलेल्या खड्यांजवळ रांगोळी काढून, फुले टाकून आणि दिवे लावून नागरिकांनी दिवाळी साजरी केली.
मागील अनेक दिवसांपासून जिंतूर यलदरी रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खोल खड्यांमुळे वाहनचालकांना संतुलन राखणे कठीण झाले आहे. त्यामुळे दररोज लहानमोठे अपघात घडत असून काही ठिकाणी वाहनांचे नुकसानही झाले आहे. याबाबत अनेकदा तक्रारी, निवेदन व खड्डे जेवण, तिरडी आंदोलन यासह विविध आंदोलन करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर स्थानिक तरुणांनी या रस्त्यावरच दिवे लावून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.काहींनी खड्यांभोवती रांगोळी काढली,तर काहींनी फुलांचा हार अर्पण करून ‘खड्ड्यांची दिवाळी’ साजरी केली. या प्रसंगी अनेकांनी मोबाईलद्वारे फोटो आणि व्हिडिओ काढून सामाजिक माध्यमांवर शेअर केले,ज्यामुळे हा अनोखा निषेध चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, "खड्डे बुजवण्याऐवजी आता आम्हालाच त्यांची पूजा करावी लागते का?" असा टोला नागरिकांनी प्रशासनावर लगावला आहे.
दरम्यान, स्थानिकांनी प्रशासनास तातडीने रस्ता दुरुस्त करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या अनोख्या आंदोलनात दामु नवले, बाळासाहेब काजळे, संतोष नवले, अभिषेक चव्हाण, रोहित चव्हाण यांच्यासह परिसरातील तरुण उपस्थित होते.