Water Crisis File Photo
परभणी

Parbhani Water Crisis: टंचाई आराखड्याच्या सर्वेक्षणालाच प्रशासनाचा अडसर! चार तालुक्यांसाठी भूजल विभागाचा एकच अधिकारी

पाथरी तालुक्यांच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करून त्याला मान्यताही मिळाली; मात्र या आराखड्यातील प्रस्तावित कामांचे भूजल सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही.

पुढारी वृत्तसेवा

पाथरी : हनुमान चव्हाण

एकीकडे तालुक्यात संभाव्य पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना दुसरीकडे टंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेतील अपुऱ्या मनुष्यबळाचा आणि साधनसुविधांचा फटका बसत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करून त्याला मान्यताही मिळाली; मात्र या आराखड्यातील प्रस्तावित कामांचे भूजल सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही.

विशेष म्हणजे, पाथरीसह मानवत, सेलू आणि जिंतूर या चार तालुक्यांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी भूजल विभागाच्या एकाच अधिकाऱ्यावर आहे. त्यात या अधिकाऱ्याकडे शासकीय वाहनही नसल्याने सर्वेक्षणासाठी गावांनीच खासगी वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे टंचाई निवारणाच्या नियोजनालाच सुरुवातीपासून अडथळ्यांची मालिका लागली आहे.

तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पाथरी पंचायत समितीच्या माध्यमातून ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. हा आराखडा जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला असून त्याला मान्यताही मिळाली आहे. आराखड्यात नवीन विंधन विहिरी, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजना तसेच विहीर व बोअरवेल अधिग्रहणाच्या कामांचा समावेश आहे.

मात्र, मान्यता मिळालेल्या आराखड्यातील कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी भूजल सर्वेक्षण विभागाकडून तांत्रिक पाहणी होणे आवश्यक आहे. ही पाहणी अद्याप पूर्ण क्षमतेने झालेली नाही. सर्वेक्षणाशिवाय पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नसल्याने प्रस्तावित कामे रखडण्याची शक्यता आहे.

चार तालुके, एक अधिकारी अन् वाहनाचा पत्ताच नाही

भूजल सर्वेक्षण विभागाकडे चार तालुक्यांचा कार्यभार सांभाळण्यासाठी एकच अधिकारी उपलब्ध असल्याची माहिती आहे. त्यात संबंधित अधिकाऱ्याला सर्वेक्षणासाठी शासकीय वाहनाची सुविधाही उपलब्ध नाही. परिणामी, एखाद्या गावातील प्रस्तावित कामाचे सर्वेक्षण करायचे असल्यास स्थानिक स्तरावर खासगी वाहन उपलब्ध आहे का, अशी विचारणा केली जात असल्याचे समोर येत आहे. पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करणाऱ्या गावांनीच आता सर्वेक्षणासाठी वाहनाची व्यवस्था करायची का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

एका अधिकाऱ्याच्या खांद्यावर चार तालुक्यांची जबाबदारी आणि त्यात वाहनाची अनुपलब्धता, अशा परिस्थितीत सर्वेक्षण वेळेत पूर्ण होणार कसे? हा प्रश्न आहे. टंचाई आराखडा तयार करताना आवश्यक कामांचे नियोजन केले जाते; मात्र त्या कामांना तांत्रिक मान्यता मिळवून देणाऱ्या यंत्रणेलाच पुरेसे मनुष्यबळ आणि वाहन उपलब्ध नसेल, तर आराखड्याच्या अंमलबजावणीला गती मिळणार तरी कशी?

टंचाई येण्यापूर्वीची तयारी की संकटानंतरची धावपळ?

पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकर, अधिग्रहण आणि तात्पुरत्या उपाययोजनांसाठी प्रशासनाची धावपळ सुरू होते. मात्र, संभाव्य टंचाई लक्षात घेऊन आधीच तयार केलेल्या आराखड्याच्या सर्वेक्षणालाच विलंब होत असेल, तर प्रतिबंधात्मक नियोजनाचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासह सर्वेक्षणासाठी शासकीय वाहनाची व्यवस्था करावी आणि प्रलंबित सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करावी, अशी मागणी केली जात आहे.

आराखड्यातील प्रस्तावित कामे

नवीन विंधन विहिरी १०९

नळ योजना विशेष दुरुस्ती ४३

तात्पुरत्या पूरक योजना १३

विहीर व बोअरवेल अधिग्रहण ११५

एकूण प्रस्तावित कामे २८०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT