Parbhani's mercury at 8.6 degrees; Cold returns to Marathwada
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा परतली असून, शनिवारी (दि. २९) परभणी जिल्ह्याचे किमान तापमान नीचांकी ८.६ अंश सेल्सिअसवर नोंदले गेले. मराठवाड्यात हे तापमान सर्वात कमी ठरले असून, लातूर आणि नांदेडमध्येही थंडीचा जोर वाढला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागाच्या नोंदीनुसार, मागील आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर काहीसा ओसरला होता. मात्र, आता आकाश निरभ्र झाल्याने उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे.
परिणामी, परभणीसह संपूर्ण मराठवाड्यात तापमानात मोठी घट झाली आहे. सकाळच्या सत्रात शाळा आणि कार्यालयांकडे जाणाऱ्या नागरिकांवरही या थंडीचा परिणाम दिसून येत आहे. परभणीपाठोपाठ लातूर जिल्ह्यातही थंडीचा कडाका जाणवत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार लातूर (उदगीर) येथे ११.० अंश सेल्सिअस, तर नांदेडमध्ये ११.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातही पारा सरासरी १३ ते १४ अंशांच्या दरम्यान पसरला आहे. असून संपूर्ण विभागात गारठा पसरला आहे.