परभणी : बुधवारी (दि.18) जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गटात सहभागी न होणाऱ्या दैठणा जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या सदस्या ज्योत्सना घाटगे यांना पक्षश्रेष्ठीने नोटीस बजावली असून काँग्रेसच्या गटात सहभागी व्हा अन्यथा कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागेल, असा इशारा नोटीसीद्वारे देण्यात आला आहे.
दैठणा जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या सदस्या ज्योत्सना गणेश घाटगे यांनी भाजपाला पोषक होईल, अशी भूमीका घेतल्याचे बोलल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने घाटगे यांना काँग्रेसच्या गटात सहभागी व्हा अन्यथा सदस्यत्व रद्द करू अशी नोटीस 10 मार्च रोजी बजावल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नव्हते. जिल्ह्यात 54 पैकी अनेक गटात निवडणुक लढवूनही परभणी तालुक्यात काँग्रेसला 3 जागा मिळाल्या होत्या. उर्वरीत 8 तालुक्यात काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते.
काँग्रेसने लोहगाव गटातील जिल्हा परिषद सदस्य अजित वरपूडकर यांची गटनेते पदी तर पेडगाव जिल्हा परिषद गटातील सदस्य जितेंद्र देशमुख यांची उपगटनेतेपदी निवड केली आहे. काँग्रेसने रितसर गट स्थापन करून गटनेता व उपगटनेत्याची निवड केल्यानंतर, दैठणा जिल्हा परिषद गटातील कॉग्रेसच्या सदस्या ज्योत्सना गणेश घाटगे या गटात सहभागी झाल्या नव्हत्या. काँग्रेस पक्षश्रेष्ठीने वारंवार सूचना देवूनही घाटगे या बैठकीला गैरहजर राहिल्या होत्या.
काँग्रेस पक्षश्रेष्ठीने याची गांभिर्याने दखल घेतल्याचे बोलल्या जात आहे. काँग्रेसचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने जि.प. सदस्या ज्योत्सना घाटगे यांना पत्र पाठवले असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या संमतीने पाठविलेल्या पत्रामध्ये काँग्रेसच्या गटात सहभागी व्हा अन्यथा कार्यवाहीला सामोरे जा, असा इशारा देण्यात आला.
काँग्रेसच्या पंजा चिन्हावर निवडून आल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन गट नोंदणीच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करावी, अन्यथा पक्षांतर बंदी कायद्यान्वये सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया केली जाईल, असा इशारा देण्यात आला. पक्षाशी बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात स्थान नसल्याचेच काँग्रेस पक्षश्रेष्ठीने पत्राद्वारे सूचित केलेे.
कोण आहेत ज्योत्सना घाटगे
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रा. रामभाउ घाटगे यांच्या ज्योत्सना घाटगे स्नूषा आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गणेश घाटगे यांच्या त्या पत्नी आहेत. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या दैठणा जिल्हा परिषद गटातून त्यांनी निवडणूक लढवत माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांच्या स्नूषा प्रेरणा वरपुडकर यांच्ाा त्यांनी मोठ्या फरकानेे पराभव केला होता.